प्रतिनिधी/ बेळगाव
देशात जूनपासून 200 लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील एक रेल्वे बेंगळूर (यशवंतपूर)-हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणार आहे. 2 जूनपासून ही सेवा सुरू करण्यात येणार असून बेळगावमार्गे ही रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे दर मंगळवार व गुरुवारी बेंगळूर येथून तर बुधवार व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून सुटणार आहे. आठवडय़ातून दोन फेऱयांचे नियोजन करण्यात आल्याचे हुबळी रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक अरविंद मलकारे यांनी ट्विट करून कळविले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प होती. दि. 22 मेपासून बेंगळूर-बेळगावदरम्यान एक स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु पुणे तसेच उत्तर भारतात जाणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत होती. अद्याप परराज्यात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने रेल्वे सुरू झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
अशी धावणार रेल्वे
दि. 2 जूनपासून दुपारी 1 वाजून 55 मि. यशवंतपूर येथून ही रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर तुमकूर, अरसिकेरे, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाडमार्गे रात्री 12 वाजून 31 मिनिटांनी बेळगावला पोहचणार आहे. त्यानंतर मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झांसीमार्गे दुपारी 1 वाजून 20 मि. हजरत निजामुद्दीन येथे पोहचणार आहे.
दि. 5 जूनपासून सकाळी वाजून 8.45 मि. हजरत निजामुद्दीन येथून रेल्वे सुटणार आहे. झांसी, भोपाळ, भुसावळ, मनमाड, पुणे, मिरजमार्गे सायंकाळी 6.48 वा. बेळगावला पोहचणार आहे. त्यानंतर धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, अरसीकेरे, तुमकूरमार्गे सकाळी 6.21 वा. यशवंतपूर येथे पोहचणार आहे.









