आयडीसीच्या अहवालात माहिती समोर – जगात भारत तिसरी मोठी बाजारपेठ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या स्पर्धेत शाओमीने बाजी मारली असल्याचे दिसले आहे. जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वाधिक फोन्सची विक्री करत शाओमी अव्वल स्थानावर राहिली आहे. भारतीय बाजारात शाओमीचेच फोन्स सर्वाधिक खपले असल्याची बाब समोर आली आहे.
इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या एका अहवालात ही बाब समोर आलीय. 2021 च्या तिसऱया तिमाहीअखेर भारतीय समार्टफोन बाजारपेठेत 12 टक्के इतकी घसरण मात्र दिसली आहे. यादरम्यान भारतात 4.8 कोटी स्मार्टफोन्स शिपमेंट (विदेशातून दाखल) केले आहेत.
शाओमीच्या वार्षिक शिपमेंटमध्ये मात्र घसरण झाली आहे. पण असं जरी असलं तरी शाओमीने स्मार्टफोनच्या बाजारात आपला दबदबा कायम राखला आहे. जगभरातील 5 जी शिपमेंटमध्ये 7 टक्केसह भारत जगातील तिसरी सर्वात मोठी 5 जी स्मार्टफोन्सची बाजारपेठ राहिली आहे.
पोकोच्या शिपमेंटमध्ये 65 टक्के वाढ
दरम्यान आयडीसीच्या माहितीनुसार शाओमीने आपली प्रगतीपर वाटचाल सुरूच ठेवली असली तरी वार्षिक स्तरावर शिपमेंटमध्ये मात्र 17 टक्के घसरण दिसलीय. शाओमीचा उपब्रँड पोकोच्या शिपमेंटमध्ये 65 टक्के इतकी लक्षणीय वाढ दिसली आहे. सॅमसंग तिमाहीत वर्षाच्या आधारावर पाहता 33 टक्के घसरणीसह दुसऱया स्थानावर राहिली आहे. वर्षाच्या स्तरावर 13 टक्के शिपमेंटमध्ये घसरणीसह विवो तिसऱया स्थानी राहिली आहे.
1.7 कोटी 5 जी फोन्स भारतात
5 जी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारत जगातील तिसऱया नंबरचा देश आहे. जगभरातील शिपमेंटपैकी 7 टक्के म्हणजेच 10 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट सप्टेंबरच्या तिमाहीत करण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2021 या काळात भारतात 1.7 कोटी 5 जी स्मार्टफोन्स शिपमेंट करण्यात आले.









