श्रीनगर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने मंगळवारी रात्री इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू, सांबा, उधमपूर आणि रियासी जिल्हय़ात ई-बँकिंगसमवेत सुरक्षित संकेतस्थळ पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईल्सवर 2जी इंटरेनट कनेक्टिव्हिटीला अनुमती देण्यात आली आहे. हा आदेश 15 जानेवारीपासून 7 दिवस लागू राहणार आहे.
हॉटेल्स, प्रवासविषयक कार्यालये आणि रुग्णालयांसह आवश्यक सेवा प्रदान करणाऱया सर्व ठिकाणी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. इंटरनेट सेवा प्रदाता कंपन्या आवश्यक सेवा पुरविणाऱया सर्व संस्था, रुग्णालये, बँकांसह शासकीय कार्यालयांमध्ये ब्रॉडबँड सुविधा प्रदान करणार आहेत. यातून समाजमाध्यम संकेतस्थळांना वगळण्यात आले आहे.
प्रशासनाने काश्मीरमध्ये अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्क स्थापन करण्यासही अनुमती दिली आहे. कियोस्कमध्ये आवश्यक कामांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्राप्त होत असते.









