विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर यांची मागणी
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शाळांमध्ये विनावेतन शिक्षक काम करत आहेत. 1995 पासूनच्या शाळांना सरकारने अनुदान देण्यास टाळाटाळ केली आहे. याचबरोबर अनेक शाळांमधील रिक्त जागा भरण्यासही परवानगी दिली नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून तातडीने या सर्व शाळांना अनुदान द्यावे, अशी मागणी अरुण शहापूर यांनी विधानपरिषदेत केली आहे. कन्नडसह इतर माध्यमांच्या शाळांना अनुदान नसल्याने अनेक शिक्षक विनावेतन काम करत आहेत. त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. याचबरोबर मुलांवरही वाईट परिणाम होत आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे. दर अधिवेशनामध्ये मी ही मागणी करतो. मात्र सरकार अद्याप गांभीर्य घेण्यास तयार नाही. तेव्हा तातडीने मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. याचबरोबर शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
वाय.नारायणस्वामी यांचीही जोरदार मागणी
यावेळी वाय. नारायणस्वामी यांनीही जोरदार मागणी केली. रिक्त झालेल्या जागा तातडीने भरण्यासाठी परवानगी द्या. कारण अनेक ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा याचा कुठेतरी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेऊन सर्वच शाळांना अनुदान तसेच रिक्त जागा भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.