विनाअनुदानित शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील 1995 नंतर सुरू झालेल्या विनाअनुदानित शाळांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही. अनुदान नसलेल्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या शाळांना अनुदान देऊन पुनरुज्जीवन करावे. मागील 15 ते 20 वर्षांपासून शाळांमध्ये विद्यादानाचे शिक्षक काम करीत असूनही त्यांना अद्याप वेतन नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. त्यामुळे या शाळांना अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे बेळगाव जिल्हा विनाअनुदानित शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे केली.
मंगळवारी मुख्यमंत्री बेळगावमध्ये होते. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सरकारला थोडा वेळ देण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ शिक्षकांना उत्तर देताना म्हणाले, 2008 साली भाजप सरकार सत्तेत असताना 1987 ते 1995 पर्यंतच्या शाळांना मंजुरी देऊन ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. यावेळीही आमचेच सरकार शाळांना मंजुरी देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बेळगाव जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. मठद, उपाध्यक्ष पी. पी. बेळगावकर, सलिम कित्तूर, एम. ए. कोरीशेट्टी, तालुका अध्यक्ष मारुती अजाणी, बसवराज कुकडोळी, एस. ए. कोकितकर, आर. ए. कुरंगी, संजय कांबळे, पावले, सूरज पिसाळे, के. पी. शिनोळकर, व्ही. एस. चौगुले, एम. जी. कदम, सी. एम. खन्नूकर, पी. के. पाटील, मारुती पाटील, सुप्रिया कदम, कोमल पाटील, आर. केसरकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.









