खानापूर : येथील वरिष्ठ न्यायालयात शनिवार दि. 12 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 199 दावे निकालात काढण्यात आली असून घटस्फोटासाठी सुरू असलेल्या दाव्यातील दांपत्यास समेट करून एकत्र नांदण्यासाठी तयार झालेल्या दांपत्याचे वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर तळवार यांनी हार घालून स्वागत करून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय कायदा सेवा आणि जिल्हा कायदा प्राधिकरणाच्या माध्यमातून शनिवार दि. 12 जुलै रोजी खानापूर येथील खानापुरात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर तळवार आणि न्यायाधीश विरेश हिरेमठ यांच्या उपस्थितीत लोकअदालतीत खटले निकालात काढण्यात आले आहेत. 199 दावे सामोपचाराने मिटवण्यात आले असून 1 कोटी 74 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली करण्यात आली आहे.
तसेच इतर दाव्यातील वादी प्रतिवादीना समझोता करून दावे निकालात काढण्यात आले आहेत. घटस्फोटासाठी सुरू असलेल्या दाव्यातील दांपत्यांचा समाझोता घडवून आणून त्यांना एकत्र नांदण्यासाठी तयार करण्यात आले. यात वरिष्ठ न्यायाधीश चंद्रशेखर तळवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यांना एकत्र नांदण्यासाठी राजी केले. यानंतर दांपत्यांचे बार असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. चंद्रशेखर तळवार यांनी दांपत्यास शुभेच्छा देवून न्यायालयातील घटस्फोटासाठी सुरू असलेल्या दाव्यात दांपत्यांनी गांभीर्याने विचार करून सामोपचाराने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, ॲड. आर. एन. पाटील, ॲड. पी. वाय. पाटील, श्रीमती बी. एस. नंदीकुर्ली, ॲड. केशव कळळेकर, ॲड. एम. ए. मुल्ला, ॲड. जी. एम. देसाई, ॲड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, ॲड. एस. आय. पाटील यासह इतर वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हेते.









