वाघा सीमेवरून मच्छिमार मायदेशी : आणखी 300 मच्छिमारांची सुटका होणार
► वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानी जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कराची येथील तुरुंगात बंद असलेल्या 198 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. सदर मच्छिमारांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या मच्छिमारांची गुऊवारी संध्याकाळी कराचीतील मालीर तुरुंगातून सुटका करण्यात आली. पाकिस्तानने तुरुंगात बंद केलेल्या भारतीय मच्छिमारांच्या पहिल्या तुकडीची सुटका केली असून मच्छिमारांच्या आणखी दोन तुकड्या जून आणि जुलैमध्ये सोडल्या जातील, असे मालीर कारागृहाचे अधीक्षक नझीर तुनियो यांनी सांगितले.
सध्या पाकिस्तानने 198 मच्छिमारांची सुटका केली असून नजिकच्या काळात आणखी दोन टप्प्यात जवळपास 300 जणांची मुक्तता केली जाणार आहे. गुरुंवारी 200 भारतीय मच्छिमारांची मलीर तुरुंगातून सुटका होणार होती, परंतु त्यापैकी दोघांचा यापूर्वीच आजारपणामुळे मृत्यू झाला. हे सर्व मच्छिमार मायदेशी परतले आहेत. सुटका करण्यात आलेले भारतीय मच्छिमार चुकून पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत घुसल्यानंतर त्यांना पाकिस्तानी नौदलाने ताब्यात घेतले होते.
अरबी समुद्रात मासेमारी करताना मच्छीमार पारंपरिक बोटींचा वापर करतात. त्यांच्याकडे अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा नसल्यामुळे त्यांचे अचूक स्थान समजू शकत नाही. समुद्रामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये स्पष्ट सीमा नाही. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे मच्छीमार चुकून एकमेकांच्या सीमेत घुसतात. या कारणास्तव संबंधित देशांचे नौदल अन्य देशांतील मच्छिमारांना पकडून त्यांच्या बोटीही जप्त करतात.








