विजय पाठक / जळगाव :
जळगाव जिल्ह्यात सन 2022 मध्ये 196 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, 2001 ते 2022 या 22 वर्षाच्या काळात जिल्ह्यात 2264 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे ठराविक तालुक्यातच हे आत्महत्यांचे प्रमाण जास्त असून, या बाबतची कारणे शोधण्याचा प्रयत्न शासन स्तरावर होणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत जळगाव जिल्ह्यात 196 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी 23 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. पाठोपाठ जूनमध्ये 22 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. मे आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 18 तर डिसेंबरमध्ये 15 आत्महत्या झाल्या. एप्रिलमध्ये सर्वात कमी आत्महत्या असून, या महिन्यात केवळ 9 आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2020 मध्ये 141 तर 2021 मध्ये 175 आत्महत्यांची नोंद झाली.
अधिक वाचा : भाई न म्हटल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांना अटक
2001 ते 2005 या काळात 65 आत्महत्या, 2006 ते 2010 या काळात 356, 2011 ते 15 मध्ये 669, 2016 ते 22 मध्ये 1178 आत्महत्या झाल्या. आहेत. अशा 22 वर्षात 2264 आत्महत्यांची नोंद झाली. या सरत्या वर्षातील आत्महत्यांचा विचार करता ठराविक तालुक्यातच आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. जामनेर तालुक्यात सर्वात जास्त 27 आत्महत्यांची नोंद झाली. पाठोपाठ चोपडा तालुक्यात 24 आत्महत्यांची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात 19 तर धरणगाव तालुक्यात 18, जळगाव तालुक्यात 17 चाळीसगाव, बोदवड तालुक्यात प्रत्येकी 12 आत्महत्या झाल्या आहेत. सर्वात कमी भडगाव तालुक्यात 5 तर भुसावळ तालुक्यात 4 आत्महत्या झाल्या. आतापर्यंत बोदवड तालुका आत्महत्येपासून दूर होता. यंदा तेथेही आत्महत्या नोंदवल्या गेल्या.
पूर्वी विदर्भ शेतकरी आत्महत्येसाठी चर्चेत होता. मात्र गेल्या दहा वर्षात जळगाव जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या 22 वर्षांचा विचार करता या ठराविकच तालुक्यात मोठया प्रमाणावर आत्महत्या होत असून, या मागील कारणे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.








