ज्याला जसे जमेल त्या मार्गे त्या मार्गे पंढरपूरला पोचावे
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : 1944 मध्ये ब्रिटीश शासनाने पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर अचानकपणे बंदी घातली होती. तेव्हा 15 जून 1944 च्या पत्रकात सावरकरांनी लिहिले, काही तरी चुकीच्या समादेशामुळे राज्यपालांनी ही बंदी घातलेली दिसते. त्यांना बहुधा पंढरपूरचे महत्त्व माहीत नसावे.
शासनाने पंढरपूर यात्रेला बंदी करावी हा हिंदूंवर अन्याय आहे. यासंबंधात मी राज्यपालांना पत्र लिहून कळविले आहे की, ह्या यात्रेला अनुज्ञा दिल्याने युद्ध प्रयत्नात किंवा अन्नधान्य उत्पादनात आणि वाटपात कोणताही अडथळा येणार नाही. तरी ही परिस्थिती लक्षात घेऊन ही बंदी उठवावी.
हे प्रकट पत्रक काढण्याच्या वेळीच सावरकरांनी यात्रेकरुंच्या गटप्रमुखांना सांगितले, ह्या पत्रात सांगितलेली योजना अशी, वाटेत अडविलेल्या सर्व वारकऱ्यांनी ती बंदी न मानता पंढरपुराकडे चालू लागावे, अटक झाल्यास त्यांनी विठ्ठलाचे नावे बंदिवास भोगावा. पांडुरंगाची मंदिरे दोन. दर्शनासाठी पंढरपूरचे आणि कार्यासाठी कारागृहाचे.
कारागृहात जाणाऱ्यांना दुप्पट पुण्य लागेल. कारण अशा प्रतिकारामुळे पुढच्या वाऱ्यांवर बंदी येणार नाही. ह्या अटकेच्या प्रसिद्धीमुळे जी जागृती होईल, ती अनेक वाऱ्यांनी होणार नाही. ज्याला जसे जमेल त्या मार्गे त्या मार्गे पंढरपूरला पोचावे. एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील सर्वांनी घराबाहेर पडून भगवी पताका खांद्यावर टाकून भगवंताचे दर्शनाला जावे.
संगिनी उभारल्या तरी त्यास न मानता पुन्हा पुन्हा देवळाकडे विद्या न्याव्यात,‘देह जावो अथवा राहो माझा पांडुरंग भावो’ ही गर्जना कसोटीस लागण्याची वेळ आली आहे असे समजून हे व्रत आचरावे. ह्यानंतर चार दिवसांनीच ही बंदी उठली. तेव्हा त्यासंबंधी सावरकरांनी शासनाचे प्रकटपणे अभिनंदन केले.
सावरकरांच्या ह्या सावधानतेमुळे किंवा शासनाला बंदी घालणे इष्ट न वाटल्याने ही बंदी पुन्हा आली नाही. पंढरपूरची यात्रा प्रतिवर्षापेक्षाही अधिक उत्साहाने यशस्वी झाली. पंढरपूरमध्ये एकाही यात्रेकरुने प्रवेश करू नये, अशी आज्ञा असतानाही तेथे दीड लाख यात्रेकरू जमले.








