200 हून अधिक प्रवाशांना वाचवले
► वृत्तसंस्था/ इक्वेटूर
चालू आठवड्यात आफ्रिकन देश काँगोच्या वायव्य भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट दुर्घटनांमध्ये किमान 193 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही प्रवासी बेपत्ता आहेत. हे अपघात बुधवार आणि गुरुवारी इक्वेटूर प्रांतात सुमारे 150 किलोमीटर अंतरावर घडल्याचे अधिकारी आणि सरकारी माध्यमांनी सांगितले.
काँगोच्या मानवतावादी व्यवहार मंत्रालयाने या दुर्घटनेची माहिती देताना गुरुवारी संध्याकाळी सुमारे 500 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला आग लागल्याने ती काँगो नदीत उलटल्याचे सांगितले. लुकोलेला परिसरातील मलांगे गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर 209 जणांना वाचवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
बासंकुसु प्रदेशात बोट उलटून 86 जणांचा मृत्यू
बुधवारी इक्वेटूर प्रांतातीलच बासंकुसु प्रदेशात एक मोटारबोट उलटल्याने किमान 86 जणांचा मृत्यू झाला. या बोटीमधून बहुतेक विद्यार्थी प्रवास करत होते. राज्य माध्यमांनुसार, अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत, परंतु त्यांची नेमकी संख्या देण्यात आलेली नाही. अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्य माध्यमांनी घटनास्थळावरून मिळालेल्या वृत्तांचा हवाला देत या अपघाताचे कारण ‘रात्रीच्या वेळी अयोग्यरित्या लोडिंग आणि बोटिंग’ असल्याचे म्हटले आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे
काँगोमध्ये बोटींचे अपघात सतत वाढत आहेत. देशातील रस्त्यांची स्थिती खूपच कमी आणि खराब असल्याने लोक अनेकदा जुन्या आणि कमकुवत लाकडी बोटींमधून प्रवास करतात. या बोटींमध्ये लाईफ जॅकेट नाहीत किंवा प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण नाही. बहुतेक बोटी रात्रीच्या वेळीही जात असल्यामुळे दुर्घटना घडल्यास बचावकार्य राबविणे अत्यंत कठीण होते.









