जगातील सर्वात वृद्ध प्राण्याचा मिळाला मान
1832 मध्ये झाला होता जन्म
प्राण्यांमध्ये कासव हा सर्वाधिक आयुष्य जगतो हे सर्वांना माहितच असेल. कासव 100 वर्षांहून अधिक वर्षे जगतात. परंतु एका कासवाने ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आणखीन एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. या कासवाचे नाव जोनाथन असून तो स्वतःचा 190 वा जन्मदिन साजरा करणार आहे. यापूर्वी हा विक्रम तुई मलीला या कासवाच्या नावावर होता. हा कासव 188 वर्षे जगला होता.
जोनाथनचा जन्म 1832 मध्ये झाला होता. 2022 मध्ये हा कासव 190 वर्षांचा होतोय. जोनाथनला 1882 मध्ये सेशेल्समधून साउथ अटलांटिक आयलँड सेंट हेलेना येथे आणले गेले होते. त्यांच्यासोबत आणखीन 3 कासव होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जोनाथन त्यावेळी पूर्णपणे प्रौढ होता. कासवासाठी पूर्णपणे प्रौढ असण्याचा अर्थ त्याचे वय 50 वर्षे असते.

गव्हर्नराच्या घरी बहुतांश वास्तव्य
1930 मध्ये सेंट हेलेनाचे गव्हर्नर स्पेंसर डेव्हिस यांनी कासवाला जोनाथन हे नाव दिले होते. जोनाथनने स्वतःचे बहुतांश जीवन गव्हर्नरांच्या घरीच घालविले आहे. तो तेथे तीन अन्य विशाल कासवांच्या संगतीत राहतो. जोनाथनला माणसांची सोबत देखील आवडते.
अत्यंत वृद्ध
जोनाथनला उन्हाचा आनंद घेणे पसंत आहे. परंतु उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये तो सावलीत पडून राहतो. कोबी, गाजर, सफरचंद, केळे, पानांचे सॅलड आणि फळे हा त्याचा पसंतीचा आहार आहे. परंतु वाढत्या वयामुळे जोनाथनची दृष्टी आता कमी झाली आहे. गंधशक्ती देखील हरविली असली तरीही त्याची श्रवणशक्ती उत्तम आहे.









