2021-22 शैक्षणिक वर्षातील 46192 अर्ज प्राप्त; मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन
अहिल्या परकाळे कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी राज्यभर लाखोंचे मोर्चे निघाले. याची दखल घेऊन सरकारने मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती जाहीर केली. 2021-22 या शैक्षणिक वर्षातील 46192 जिल्हय़ातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले आहे. त्यापैकी 27290 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 1 कोटी 33 लाख 82 हजार 556 रूपये शिष्यवृत्ती जमा केली आहे. परंतू उर्वरीत 18 हजार 902 विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर मध्यंतरीच्या काळात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ही शिष्यवृत्ती पुन्हा बंद होते की काय? अशी भिती विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतू कोर्टाने शैक्षणिक आरक्षण आहे तसे ठेवल्याने, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. ऐवढेच नाही तर शिक्षण घेणाऱयांचे प्रमाणही राहणार आहे. गेल्या पाच वर्षापासून आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कातील काही रक्कम परत मिळते. या शिष्यवृत्तीचा लाभ राज्यातील लाखो तर जिल्हय़ातील 46192 विद्यार्थी लाभ होतोय. बऱयाचवेळा विद्यार्थीनींना इच्छा असूनही परिस्थिती नसल्याने पदवी व पदव्युत्तर शिक्षणाला मुकावे लागते. ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थीनींचा आधारवड बनली असून, अनेक विद्यार्थीनी पदव्युत्तरचे शिक्षण घेऊ लागल्या आहेत, अशा भावना विद्यार्थीनींकडून व्यक्त होत आहेत.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू आहे. पदवी, पदव्युत्तरच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा, यासाठी सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयांना मिळालेल्या सूचनांप्रमाणे महाविद्यालयांकडूनही अर्ज भरूण घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कार्यशाळांच्या माध्यमातून दरवर्षी जनजागृती केली जात असल्यानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग
2021-22 शैक्षणिक वर्षात 46192 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 27290 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 1 कोटी 33 लाख 82 हजार 556 रूपये जमा केले आहेत. परंतू उर्वरित 18 हजार 902 विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती वर्ग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून दिली आहे. परंतू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लवकरात लवकर देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत.
मिळणाऱ्या शिष्यवृत्त्यांची यादी
-राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
-डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
-एकलव्य आर्थिक सहाय्य योजना
-गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर)
-राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती
-शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती
-जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
-राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
-गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थी शिष्यवृत्ती
-माजी सैनिक पाल्याला आर्थिक सहाय्य
-स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याला आर्थिक सहाय्य
गतवर्षीपेक्षा 10 टक्के विद्यार्थी वाढवण्याचा प्रयत्न
मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहे. नियम व अटींची माहिती महाविद्यालय, विद्यार्थ्यांना माहिती पुरवली जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे.
डॉ. हेमंत कटरे (सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय)