सर्वाधिक अरभावी तर सर्वात कमी कित्तूर मतदारसंघात : लोकशाही बळकटीसाठी भूमिका मोलाची
बेळगाव : देशासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा लोकशाहीचा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी युवा मतदारांची भूमिका सर्वात मोलाची असते. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी मतदारांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावणे आवश्यक आहे. राज्य सरकार आगामी जि. पं., ता. पं. व ग्रा. पं. निवडणुका घेण्याच्यादृष्टीने पावले उचलत असल्याचे समजते. यादृष्टीने युवा मतदारांचे महत्त्व वाढणार आहे. जिल्ह्यात एकूण 18 लाख 97 हजार 670 युवा मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 1 लाख 3 हजार 80, 20 ते 29 वयोगटातील 8 लाख 51 हजार 742 तर 30 ते 39 वयोगटात 9 लाख 42 हजार 848 युवा मतदार आहेत.
18 ते 19 वयोगटात 54 हजार 157 पुरुष, 48 हजार 909 महिला तर 14 तृतीय पंथीय मतदार आहेत. 20 ते 29 वयोगटात 4 लाख 41 हजार 883 पुरुष, 4 लाख 9 हजार 786 महिला तर 73 तृतीय पंथीय मतदार आहेत. तसेच 30 ते 39 वयोगटात 4 लाख 75 हजार 527 पुरुष तर 4 लाख 67 हजार 264 महिला आणि 57 तृतीय पंथीय मतदार आहेत. यामध्ये सर्वाधित युवा मतदार अरभावी मतदारसंघात 1 लाख 29 हजार 813 तर सर्वात कमी कित्तूर मतदारसंघात 90 हजार 893 युवा मतदार आहेत.
राज्य सरकार डिसेंबरमध्ये जि. पं., तां. पं. निवडणुका घेण्याच्या विचाराधीन असल्याचे समजते. यामुळे या स्थानिक निवडणुकीत युवा मतदारांवर सर्वांची नजर राहणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने युवा मतदार असून हा मतदार वर्ग कोणाकडे झुकतो, त्याचेच पारडे वरचढ ठरणार आहे. सध्या युवा मतदारांवरच लोकशाहीचा पाया टिकून आहे. तसेच सर्वजण आपल्याकडे युवा मतदार वळतील, यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. एकंदरीत जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये युवा मतदारांचे वर्चस्व राहणार असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
लोकशाही सुदृढ व समृद्ध असेल तर देशाच्या विकासाला गती येण्यास बळ मिळते. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी युवा मतदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. 18 वर्षांवरील मतदारांची नावे नोंद करण्यास बीएलओंच्या माध्यमातून मतदारयादी तयार करण्यात येते. तसेच लवकरात लवकर 18 वर्षांवरील मतदारांची नावे कशी नोंद करता येतील, यासाठी जोरकसपणे प्रयत्न करण्यात येतात. यासाठी बीएलओंनाही तारेवरची कसरत करावी लागते.
आजकालची युवा पिढी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिली आहे. युवाशक्तीमध्ये देश बदलाची ताकद असल्याचेही अनेकवेळा पहावयास मिळाले आहे. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आहे. आपल्या देशाची लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचेही जगाने पाहिले आहे. युवा मतदारांसह प्रौढ मतदार आपल्या मताच्या साहाय्याने लोकशाही बळकट करत आहेत. मात्र आजकाल युवा मतदारांचे महत्त्व वाढले असून त्यांच्या मतावरच सत्ताकेंद्र निश्चित होत असल्याचे पहावयास मिळाले आहे.
आगामी निवडणुकीत सर्वांची नजर युवा मतदारांवरच
बेळगाव जिल्ह्यातही मोठ्या संख्येने युवा मतदार असल्याचे मतदारयादीतून दिसून येत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत सर्वांची नजर युवा मतदारांवरच राहणार आहे. आगामी जि. पं., ता. पं. व ग्रा. पं. निवडणुकीत युवा मतदारांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्यावरच निवडणुकीचे वातावरण फिरणार आहे. यासाठी मतदारयादीला अंतिम करण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. बीएलओंकडूनडी वेगाने काम करण्यात येत असून लवकरच अंतिम यादी तयार होणार आहे.









