30 आठवडे पुरेल इतका चारा साठा : चारा टंचाईची चिंता मिटली : पशुसंगोपन खात्याची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात मुबलक प्रमाणात चारा साठा उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत तब्बल 19 लाख 10 हजार 496 मेट्रिक टन चारा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील तीस आठवडे चारा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
मागील चार वर्षात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सुका आणि ओला चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. यंदा देखील चारा मुबलक असल्याने चाराटंचाईची चिंता मिटली आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात चारा साठा खराब झाला होता. त्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली होती. दरम्यान, खात्याने चारा छावण्यादेखील सुरू केल्या होत्या. मात्र, यंदा येत्या पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे.
पावसाळ्या दरम्यान झालेल्या दमदार पावसामुळे जलाशये, नदी, तलावांची पाणीपातळी वाढली होती. शिवाय अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्याने ओल्या चाऱ्याची जोमाने वाढ झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात चारा साठा समाधानकारक आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता दूर झाली आहे. खात्यामार्फत दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, यासाठी बियाणांचे वितरण केले जाते. मका, ज्वारी, कडवळ आणि इतर बियाणे मोफत वाटप केली जातात. या सुधारित बियाणांमुळे जनावरांना सकस चारा उपलब्ध होत आहे. त्यामुळे चारा साठ्यातदेखील भर पडत आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामालादेखील प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पशुपालकांना ओला चारा उपलब्ध होत आहे. शिवाय सध्या तरी पुढील सात महिने पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याने चाराटंचाईची चिंता करू नये, असे आवाहन खात्याने केले आहे.
चाऱ्याची समस्या नाही
पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसाने जिल्ह्यात चारा साठा शिल्लक आहे. शिवाय कोठेही चाऱ्याची समस्या भासणार नाही. शिवाय चारा विकत घेण्याची वेळ पशुपालकांवर येणार नाही. सुका आणि ओल्या चाऱ्याचा साठा शिल्लक असल्याने पुढील 30 आठवडे चाऱ्याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
-डॉ. राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन खाते
- तालुके चारा साठा (मेट्रिक टन)
- अथणी 2 लाख 15 हजार 622
- कागवाड 59 हजार 652
- बैलहोंगल 62 हजार 133
- कित्तूर 50 हजार 388
- बेळगाव 1 लाख 71 हजार 639
- चिकोडी 1 लाख 73 हजार 43
- निपाणी 1 लाख 44 हजार 311
- गोकाक 1 लाख 56 हजार 363
- मुडलगी 1 लाख 54 हजार 137
- हुक्केरी 2 लाख 27 हजार 694
- खानापूर 88 हजार 352
- रायबाग 2 लाख 16 हजार 361
- रामदुर्ग 90 हजार 156
- सौंदत्ती 1 लाख 646
- एकूण 19 लाख 10 हजार 496









