पूर-भूस्खलनाच्या घटना, 12 हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
देशात वेळेपूर्वी दाखल झालेला मान्सून ईशान्येकडील भागात कहर करत आहे. गेल्या तीन दिवसांत ईशान्येकडील मणिपूर, मिझोरम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा येथे सतत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हजारांहून अधिक कुटुंबे बाधित झाली आहेत. या राज्यांमध्ये घरे कोसळल्याने मोठ्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण मिझोरममधील लॉंगटलाई शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे पाच घरे आणि एक हॉटेल कोसळले. त्यात अनेक लोक अडकले. लॉंगटलाई जिह्यातील सर्वात मोठी नागरी सामाजिक संस्था यंग लाई असोसिएशनच्या स्वयंसेवकांसह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरू आहे. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 54 बंद झाल्यामुळे मिझोरामच्या दक्षिणेकडील जिल्हा सियाहाशी लॉंगटलाईचा संपर्क तुटला आहे. आसामच्या कामरूप मेट्रो जिह्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला. गुवाहाटी आणि सिलचरमध्ये 10 हजारांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले. लखीमपूरमध्ये पुराच्या पाण्याने रिंग बांध फुटल्यामुळे परिसरात हाहाकार निर्माण झाला आहे.









