पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या बुधवार पेठेतील एका कुंटनखान्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 19 बाग्लादेशींना पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्यामध्ये 10 महिला आणि 9 पुरूषांचा समावेश आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांग्लादेशातून दहा महिला व नऊ पुरुषांनी भारतात प्रवेश केला आहे. ते सर्वजण बुधवार पेठेतील वेश्या गल्लीत वास्तव्य करत असून, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व शाबीत करणारे कोणतेही दस्ताऐवज नसल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून 19 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी पारपत्र अधिनियम 1950 चे कलम तीन सह 6, परकीय नागरिक आदेश 1948 चा नियम 3 (1) सह परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या दहा बांग्लादेशी महिला या वेश्याव्यवसाय करत होत्या व नऊ बांग्लादेशी पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करत होते. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.