कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभागात बीएस्सी. बीएड चार वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम गतवर्षीपासून सुरू केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षानंतर बीएस्सी पदवीसह शिक्षणशास्त्रची पदवी मिळते. तसेच विद्यार्थ्याच्या शिक्षण खात्यात 188 क्रेडिट जमा होतात. या अभ्यासक्रमाला प्रतिवर्षी 68 हजार 472 रूपये प्रवेश शुल्क आहे. प्रवेश क्षमता 50 असून यंदा देशभरातून 38 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
भारत सरकार उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय परीक्षा एजेंसीतर्फे बीएस्सी. बी.एडची प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. शिवाजी विद्यापीठातील बीएस्सी. बीएडला 50 प्रवेश क्षमता आहे. यंदा ओडिसा, बिहार, अरूणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी भागातून 38 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिले वर्ष पूर्ण करून गॅपही घेता येतो. परंतु पहिल्या वर्षी फक्त 44 क्रेडिटसह प्रमाणपत्र मिळते. दुसऱ्या वर्षी 88 क्रेडिटसह पदविका प्रमाणपत्र आणि तिसऱ्या वर्षी 132 क्रेडिटसह बीएस्सी पदवी प्रमाणपत्र मिळते.
चार वर्षानंतर 188 क्रेडिटसह बीएस्सी. बीएड अशा दोन पदव्या मिळतात. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयात तिसऱ्या व चौथ्या वर्षी स्पेशलायझेशन करता येते.
नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमानुसार पहिल्या वर्षी बीएस्सीचे सहा पेपर व शिक्षणशास्त्राचा पायाभूत अभ्यासक्रम आहे. तसेच तीन प्रॅक्टीकलसह इंग्रजी विषय सक्तीचा आहे. दुसऱ्या वर्षी विज्ञान शाखानिहाय सहा अभ्यासक्रम, तीन प्रॅक्टीकल असतील. तसेच शिक्षणशास्त्रचा अभ्यासक्रम भारतीय परंपरा आणि भारतीय ज्ञानप्रणालीच्या पेपरसह हिंदी विषयाची सक्ती आहे. तिसऱ्या वर्षाला विज्ञान शाखेचे सहा पेपर, शिक्षणशास्त्र पायाभूत सुविधा पेपर, आशय अध्यापन पध्दतीचे दोन पेपर असतील. तसेच शाळा निरीक्षक प्रात्यक्षिके असतील. चौथ्या वर्षाला शिक्षणशास्त्र मूलभूत पेपर, ऐच्छिक तीन विषय, पर्यावरणशास्त्र व शाश्वत विकास, मार्गदर्शन आणि समुपदेशन, सर्वसमावेशक शिक्षण तीन पेपर. सराव पाठ म्हणजे शाळेत जाऊन अध्यापन करायचे आहे. त्यानंतर 188 क्रेडिटसह 640 गुणांचे बीएड प्रमाणपत्र मिळणार आहे. शिक्षणशास्त्र अधिविभागात या विषयांचे अध्यापन करण्यासाठी तीन नियमित प्राध्यापकांसह सहा सहयोगी शिक्षक आहेत. तसेच विषय तज्ञांना गेस्ट लेक्चर म्हणून अध्यापनासाठी बोलावले जाते.
- देशभरातील विद्यार्थी असल्याने सांस्कृतिक देवाण-घेवाण
केंद्र सरकारकडून प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. त्यामुळे ओडिसा, बिहार, अरूणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे भाषेसह सांस्कृतिक देवाण-घेवाण होणार आहे. प्रत्येक राज्यातील चाली-रिती, रूढी, परंपरा विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.
- नोकरीची शंभर टक्के हमी
विज्ञानबरोबर शिक्षणशास्त्राची पदवी मिळते. विज्ञान दृष्टिकोन विकसित झालेले शिक्षक निर्माण होतील. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याने सुजाण नागरिक तयार होईल. भविष्यात संशोधनही करता येते. इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना अध्यापन करता येते. या अभ्यासक्रमात नोकरीची शंभर टक्के हमी आहे.
डॉ. रूपाली संकपाळ (सहयोगी प्राध्यापक, शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)








