वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या डावामध्ये दोनवेळा पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला होता. दरम्यान विंडीजने भारताला 40.5 षटकात 181 धावावर रोखले. इशान किसनने अर्धशतक झळकविले तर शेफर्ड आणि मॉटी यांनी प्रत्येकी 3 तर जोसेफने दोन गडी बाद केले.
विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताच्या डावाला इशान किसन आणि गिल यांनी धडाकेबाज सुरुवात करताना 16.5 षटकात 90 धावांची भागीदारी केली. गिलने 49 चेंडूत 5 चौकारांसह 34 धावा जमवल्या. सलामी इशान किसनने 55 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 55 धावा जमवित तो बाद झाला. भारताची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर डावाला गळती सुरू झाली. संजू सॅमसन 9 धावांवर, अक्षर पटेल एका धावेवर, कर्णधार हार्दिक पांड्या 7 धावावर बाद झाले. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमवल्या. रविंद्र जडेजाने 10 तर शार्दुल ठाकुरने 2 चौकारांसह 16 धावा जमवल्या. त्यानंतर उमरान मलिक आणि मुकेशकुमार हे अनुक्रमे 0 आणि 6 धावावर बाद झाले. भारताचा डाव 40.5 षटकात 181 धावात आटोपला.
या सामन्यात भारताची स्थिती 24.1 षटकात 5 बाद 113 असताना पावसामुळे पहिल्यांदा खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर भारताने 37.3 षटकात 8 बाद 167 धावा जमवल्या असताना पुन्हा पावसामुळे दुसऱ्यांदा खेळ थांबवला गेला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा तसेच विराट कोहली यांनी विश्रांती घेतली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या 10 षटकात भारताने एकही गडी न गमावता 49 धावा केल्या होत्या. विंडीजचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले तर त्यांची गोलंदाजी समाधानकारक झाली. शेफर्डने 37 धावात 3 तर मॉटीने 36 धावात 3 गडी बाद केले होते. जोसेफ 35 धावात 2, सिलेस आणि कॅरे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला होता. या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून विंडीजवर आघाडी यापूर्वी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत 40.5 षटकात सर्वबाद 181 (इशान किसन 1 षटकार आणि 6 चौकारांसह 55, गिल 5 चौकारांसह 34, सॅमसन 9, अक्षर पटेल 1, पांड्या 7, सूर्यकुमार यादव 3 चौकारांसह 24, जडेजा 10, शार्दुल ठाकुर 2 चौकारांसह 16, कुलदीप यादव नाबाद 8, उमरान मलिक 0, मुकेशकुमार 6, अवांतर 11, शेफर्ड 3-37, मॉटी 3-36, जोसेफ 2-35, सिलेस, कॅरे प्रत्येकी एक बळी).









