इस्रायलमध्ये पुरातत्व विभागाला यश
इस्रायलमध्ये मागील काही काळापासून प्राचीन सामग्रीचा शोध घेतला जात आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत पुरातत्व विभागाने एक अत्यंत मोठा शोध लावला आहे. 1800 वर्षे जुन्या दागिन्यांचा शोध पुरातत्व विभागाने लावला आहे. विशेष म्हणजे हे सर्व दागिने मुलींच्या सांगाडय़ांवर आढळून आले आहेत. संबंधित काळात दागिने परिधान करून मृत मुलींना दफन करण्यात येत होते असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
इस्रायलच्या जेरूसलेममध्ये हे उत्खनन कार्य पार पडले आहे. उत्खननात प्राप्त सामग्रीवर रोमन देवता लूनाचे चिन्ह असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. संबंधित दागिने मुली परिधान करत होत्या आणि या दागिन्यांसोबतच मृत्यूनंतर त्यांना दफन करण्यात येत होते. संबंधित काळात अशाप्रकारची प्रथा राहिली असावी. मुलींचे रक्षण व्हावे म्हणून हे दागिने त्यांना परिधान केले जात होते असे सांगण्यात आले.

मुलींचा मृत्यू झाल्यावरही मृतदेहांवर आणखी दागिने परिधान केले जात होते. या मृतदेहांना अक्षरशः दागिन्यांनी मढले जात होते. मृत्यूनंतरही त्यांचे रक्षण व्हावे अशी धारणा लोकांची राहिली असण्याची शक्यता आहे. उत्खननादरम्यान 1800 वर्षे जुना सांगाडा सापडला असून तो एका मुलीचा आहे. याचमुळे हे दागिने देखील 1800 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगाडय़ासोबत सोन्याची कर्णफुले, हेअरपिन, सोन्याचे पेंडेंट, गोल्ड बीड्स, ग्लास बीड आढळून आले आहे. या दागिन्यांची काही छायाचित्रेही जारी करण्यात आली आहेत. उत्खननादरम्यान प्राप्त दागिन्यांना एका प्रदर्शनात मांडले जाणर आहे.









