वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्राप्तीकर विभागाने काँग्रेस पक्षाला 1 हजार 823 कोटी रुपयांची प्राप्तीकर थकबाकी भरण्याची नोटीस पाठविली आहे. या पक्षाने नेहमीच आपल्या उत्पन्नापेक्षा कमी कर भरला असून गेल्या कित्येक वर्षांमध्ये कराची रक्कम साठून ती आता या पातळीवर पोहचल्याचे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारचा हा कर दहशतवाद असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षावरच कर चुकविल्याचा आरोप केला. भारतीय जनता पक्षाने 8 हजार कोटी रुपये निवडणूक रोख्यांमधून मिळविले आहेत. त्यावर 4 हजार कोटी रुपयांचा कर भरणे आवश्यक असूनही तो भरलेला नाही. काँग्रेसला मात्र नोटीस पाठविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.









