जास्तीत जास्त जगण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, ही वस्तुस्थिती आहे. कधी ना कधी आपला अंत होणार हे पुरतेपणी महिती असूनही ही इच्छा संपत नाही. अमेरिकेतील एक उद्योगपती आणि न्यूयॉर्क टाईम्स प्रकाशनाचा बेस्टसेलिंग लेखक अशी ख्याती मिळविलेले डेव एस्पे यांची महत्वाकांक्षा किमान 180 वर्षे जगण्याची आहे. यासाठी त्यांनी एक अनोखा प्रयत्न केला आहे.
त्यांनी आपल्या हाडांच्या मगजामधून (बोन मॅरो) आपल्याच मूलपेशी (स्टेम सेल्स) काढून घेतल्या आणि त्यांचे पुनरारोपण करून घेतले. विज्ञानालाही आतापर्यंत ज्ञात नसलेल्या या प्रयोगाने आपल्या अवयवांना नवसंजीवनी मिळेल आणि आपण 180 वर्षांच्या आयुष्याचे धनी होऊ, असा त्यांचा विश्वास आहे.
आतापर्यंत साडेसात कोटी खर्च
त्यांनी आतापर्यंत या प्रयोगावर 7.4 कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यांचे सध्याचे वय 55 वर्षांचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तरूण वयात शरीरात मूल पेशींचे प्रमाण खूप मोठे असते. मात्र जसजसे वय वाढते तशी मूलपेशींची संख्या कमी होत जाते. त्यांची संख्या जशी कमी होईल तशी माणसाची मृत्यूकडे वाटचाल होऊ लागते. मात्र आपण ताज्या मूलपेशींचे नव्याने आरोपण केल्याने शरीराचे अवयव पुन्हा तरूण आणि ताजेतवाने होत आहेत. त्यामुळे मृत्यू आणखी किमान 10 दशके पुढे ढकलता येणार आहे असे त्यांचे म्हणणे. नजीकच्या भविष्यकाळात हा उपाय अगदी मोबाईलचा उपयोग ज्या सहजगत्या केला जातो तेवढय़ा सोपेपणाने हा मूलपेशीच्या ‘अमृता’चा उपचार करता येईल.
त्यांनी हा प्रयोग सुरू तर केला आहे. आता खरोखरच तो अपेक्षित परिणाम देतो का याकडे त्यांचे डॉक्टर्स आणि इतरांचेही बारकाईने लक्ष आहे.









