अपघाताबाबत विविध शंका-कुशंका उपस्थित
किव्ह / वृत्तसंस्था
युपेनची राजधानी किव्ह येथे बुधवारी एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 2 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यात गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचा समावेश आहे. या दुर्घटनेसंबंधी अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. सदर हेलिकॉप्टर युपेनच्या हवाई दलाने गैरसमजातून पाडल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. याबाबत अधिक तपास केला जात आहे. युपेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
युपेन सरकार किंवा लष्कराने सुरुवातीला या हेलिकॉप्टर अपघाताबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, नंतर आम्हाला काही वेगळी माहिती मिळाली आहे. सध्याच याबाबत काहीही बोलणे घाईचे होईल. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे, असे हवाई दलाचे प्रवक्ते युरी इनहाट यांनी सांगितले. अपघाताबाबत अधिक माहिती न देण्याबरोबरच दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरची माहितीही अधिकाऱयांनी दिलेली नाही.
युपेनचे वृत्तपत्र ‘किव्ह इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टर एका बालवाडी शाळेजवळ कोसळल्यामुळे तेथील लहान मुले आणि कर्मचाऱयांनाही त्याचा फटका बसला. एकंदर या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 29 जण जखमी झाले असून त्यापैकी 15 मुले आहेत. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बालवाडीच्या इमारतीला आग लागल्याचे किव्हचे राज्यपाल ओलेसी कुलेबा यांनी सांगितले.
अपघात किंवा कट
घटनेच्या वेळी परिसरात दाट धुके होते आणि काही वेळापूर्वी बर्फवृष्टी झाली होती. त्या अनुषंगाने काही तज्ञ या दुर्घटनेचे कारण खराब हवामान असल्याचे मानत आहेत. खराब हवामानामुळे पायलटला विद्युत तारा न दिसल्यामुळे त्यांना धडकून हेलिकॉप्टर कोसळले असावे, असे सांगण्यात आले. या परिसरात काही विद्युत ताराही तुटलेल्या आढळून आल्या आहेत. कमी पातळीवरील उड्डाणामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यात गृहमंत्र्यांचा मृत्यू झाल्यामुळे ही दुर्घटना ‘अपघात की कट’ अशी शंका उपस्थित होत आहे. तथापि, रशियाने या हेलिकॉप्टरला लक्ष्य केले नसल्याचेही सांगण्यात आले आहे.









