श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. राजौरीचे एसएसपी मोहम्मद अस्लम यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या रविवारी म्हणजे 1 जानेवारीच्या संध्याकाळी गोळीबारात जखमी झालेल्या प्रिन्स शर्मा या आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर मृतांचा आकडा 7 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.
राजौरीतील डांगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. तपास आणि चौकशीत काही महत्त्वाचे निष्कर्ष मिळाले आहेत. राजौरी शहराजवळील काही गावांमध्ये दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच या हल्ल्याचे गूढ उकलणार आहे.
राजौरीतील डांगरी भागात टार्गेट किलिंग झाल्यानंतर जम्मू विभागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफने सीमेवर ऑपरेशन सरद हवाही सुरू केले आहे. बीएसएफने सीमेवरील गस्त वाढवली आहे. त्याचबरोबर सांबा प्रशासनाकडून सीमेच्या एक किलोमीटर परिघात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट यशस्वी होऊ नये, यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.









