प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील बाची चेकपोस्टवर शुक्रवारी 18 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम कोल्हापूर येथील कंत्राटदाराची असल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात प्रवेश करणारी वाहने अडवून तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी कुडाळहून बेळगावकडे येणारी एक इनोव्हा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 18 लाख रुपये रोकड आढळली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील श्रीजित मुचंडी या कंत्राटदाराशी संबंधित ही रक्कम असून यासाठी आवश्यक कागदपत्रे हजर न केल्यामुळे रक्कम ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.









