सांगली :
शासनाने शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले होते. परंतु गेल्या पाच महिन्यापासून अनुदान थकल्याने जिल्ह्यातील सुमारे सोळा हजार शेतकरी दुध अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आता वाढीव दराने जाहीर केलेले अनुदान मिळणार की लाडक्या बहिणीचा फटका त्यालाही बसणार याची चिंता त्यांना लागली आहे.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या अनुदानाचा पहिला टप्पा तयार केला होता. या कालावधीत जिल्ह्यातील 18 हजार शेतकऱ्याचे विविध दुध संघांनी चार कोटी 48 लाख 65 हजार 409 लीटर दुध संकलित केले होते. या शेतकऱ्यांना प्रति लीटर पाचरूपये प्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी अकरा दुध संघामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यातील हे सर्व अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. परंतु ऑक्टोबर पासून जानेवारीपर्यंत सुमारे तीन कोटी 38 लाख 11 हजार 394 लीटर दुध संकलीत करण्यात आले होते. या दुधावरील सुमारे 15800 शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी 18 कोटी 39 लाख 1 हजार 355 रूपयांचा प्रस्ताव जिल्हास्तरावरून शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
शासनानेही हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले नाही. शासनाच्या अन्य योजनाप्रमाणे या योजनेलाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली अहे.
- अर्ज करून शेतकरी वैतागले
सरकारने प्रतिलीटर अनुदान पाच रूपयावरून सात रूपयापर्यंत करण्याची घोषणा केली आहे. परंतु अद्याप पहिलेच पाच रूपये अनुदान अद्याप मिळाले नसल्याने अर्ज करून शेतकरी वैतागले आहेत. पाच महिन्यापासून रखडलेले 18 कोटी जिल्ह्याला केव्हा मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे.








