भारतीय औषध कंपनी जबाबदार असल्याचा आरोप
वृत्तसंस्था / ताश्कंद
एका भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सिरपचे सेवन केल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझ्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. गांबियामध्ये औषधाचे सेवन केल्याने झालेल्या मुलांच्या मृत्यूचे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच उझ्बेकिस्तानात हा प्रकार घडला आहे.
उझ्बेकिस्तानच्या सरकारने मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आरोप केला आहे. ही कंपनी 2012 मध्ये उझ्बेकिस्तानात नोंदणीकृत झाली होती. मुलांनी नोएडा येथील मॅरियन बायोटेककडून निर्मित डॉक-1 मॅक्स सिरपचे सेवन केले होते असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधाचे 2-7 दिवसांपर्यंत दिवसातून 3-4 वेळा सेवन केले होते. याचे प्रमाण 2.5-5 मिलिलीटरदरम्यान राहिले असून मुलांसाठीच्या औषधाच्या निश्चित डोसपेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे उझ्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे. तसेच तेथील सरकारने थेट स्वपरात औषध निर्मितीत चूक झाल्याचा आरोप केलेला नाही.
औषधात प्रामुख्याने पॅरासिटामॉल असून त्याचा संबंधित मुलांच्या आईवडिलांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. हे औषध थेट मेडिकलमधून खरेदी केले आहे, किंवा त्याचा चुकीच्या कारणांसाठी अधिक वापर केल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
डॉक-1 मॅक्स सिरपच्या या सीरिजमध्ये एथिलीन ग्लायकॉल असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत आढळून आले आहे. एथिलीन ग्लायकॉल एक हानिकारक पदार्थ आहे, या पदार्थाचे सेवन करताच उलटी, बेशुद्ध होणे, हृदयाशी संबंधित समस्या आणि किडनी निकामी होण्याचा धोका असतो असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुलांच्या मृत्यूप्रकरणी एकूण 7 अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तर अनेक वैद्यकीय तज्ञांवर कारवाई करण्यात आली आहे.
डॉक-1 मॅक्स औषधाचे टॅबलेट तसेच सिरप सर्व मेडिकल स्टोअरमधून मागे घेण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने पालकांना स्वतःच्या मुलांच्या आरोग्याबद्दल सजग राहण्यास सांगितले आहे. तसेच मेडिकल स्टोअरना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध न देण्याचा निर्देश देण्यात आला आहे.
यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने गांबियात मेडेन फार्माकडून निर्मित चार कफ सिरपसाठी अलर्ट जारी केला होता. या औषधांना गांबियात 66 मुलांच्या मृत्यूशी जोडण्यात आले होते. घाईगडबडीत मुलांच्या मृत्यूसाठी भारतीय औषध कंपन्यांना जबाबदार ठरविण्यात आले होते, यामुळे जागतिक पातळीवर भारतीय औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे डीसीजीआयने जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून कळविले होते.









