उडकेरी येथील घटना : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या मळ्याला आग लागून 18 एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाल्याची घटना उडकेरी (ता. बैलहोंगल) येथे घडली आहे. उडकेरी येथील प्रगतशील शेतकरी महांतेश गुळप्पनवर यांचा गावच्या बसस्थानकानजीकच उसाचा मळा आहे.
मळ्याच्या बाजूने वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. वीजवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उसाच्या पिकात पडल्या. तत्काळ उसाच्या फडाने पेट घेतला. ग्रामस्थांपैकी काहींना आगीचा प्रकार दिसून आल्यानंतर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बघता बघता आग आवाक्याबाहेर जाऊन 18 एकर जमिनीतील संपूर्ण ऊस जळून बेचिराख झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. काही वेळाने सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर येथील अग्निशमन दलाचे बंब एका पाठोपाठ हजर झाले. तत्पूर्वीच संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. या घटनेत शेतकरी गुळप्पनवर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दोडवाड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. महसूल विभागाने पाहणी करून शेतकऱ्याला भरपाई मिळवून द्यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.









