बेंगळूर : प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेंतर्गत शुक्रवारी देशातील 9 कोटी शेतकऱयांना प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे एकूण 18 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रक्कम थेट शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा करून शेतकऱयांविषयी असणारी तळमळ दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत लहान आणि अति लहान शेतकऱयांना वर्षाला तीन टप्प्यात 6 हजार रुपये देण्यात येत आहेत. ही योजना जारी झालेल्या दिवसापासून 1 लाख 10 हजार कोटी रुपये शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. केंद्रात भाजप पक्षाची सत्ता आल्यानंतर जारी करण्यात आलेली ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सरकारने शेतीतील उत्पादन खर्च कमी केला आहे. माती परीक्षण, फसल बिमा योजना, युरीयामध्ये कडुलिंबाचे मिश्रण आदी योजना जारी करण्यात आल्या आहेत. 2014 पासून केंद्र सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठिशी आहे, असे समर्थन त्यांनी केले.









