आत्मघाती स्फोटात बचावलेली शमसीया प्रवेशपरीक्षेत अव्वल
वृत्तसंस्था/ काबूल
काबूलमधील 18 वर्षीय शमसीया अलीजादा या मुलीने अफगाणिस्तानात नवा इतिहास रचला आहे. राष्ट्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेत तिने 2 लाख विद्यार्थ्यांदरम्यान अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच तिने सर्वात कमी वयात ही कामगिरी गाठणारी विद्यार्थिनी होण्याचा मान मिळविला आहे.
माझ्या आईला अनेक वर्षांपासून हसतानाच पाहिले नव्हते. तिच्या चेहऱयावरील हास्य माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कुठल्याही स्थितीत विद्यापीठात शिकण्याचा निर्धार मी केला होता. परंतु मी पुढील शिक्षणासाठी जोखीम पत्करावी, असे आईला वाटत नव्हते. माझ्या कोचिंग सेंटरमध्ये 2018 मध्ये तालिबानी आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 100 हून अधिक जणांनी जीव गमावला होता. याच केंद्रात चांगले शिक्षण घेऊन गरीबी आणि जुलुमाच्या विरोधात लढण्याचे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिले होते. परंतु क्षणार्धात सर्वकाही विरून गेले होते, असे शमसीयाने म्हटले होते.
अलजेब्रा आणि गणिताच्या समीकरणासोबत पांढऱया फळय़ावर तेव्हा रक्ताच्या डागाशिवाय तेथे काहीच दिसत नव्हते. तरीही मी हिंमत हरले नाही, पुढील शिक्षण चालूच ठेवल्याचे शमसीयाने सांगितले आहे.
मुलींच्या शिक्षणाला तालिबानचा विरोध
अफगाणिस्तानात शमसीया भावनिक स्तरावर वलयांकित ठरली आहे. परंतु तिचे हे यश सरकारला मुलींना शिक्षण मिळवून देण्याच्या अधिकाराचे स्मरण करून देणारे आहे. तेथील सरकार तालिबानसोबत शांतता चर्चा करत आहे. 1990 मध्ये तालिबानी राजवटीने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. अफगाणिस्तानात शिक्षणाच्या स्थितीत अलिकडच्या काळात सुधारणा झाली आहे. तेथील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ 24.2 टक्के आहे.
हजारा समुदाय लक्ष्य
गजनी प्रांतात राहणारी शमसीया हजारा समुदायाशी संबंधित आहे. 5 सदस्यांचे तिचे कुटुंब उत्तम शिक्षणासाठी काबूल येथे स्थलांतरित झाले. शिक्षणासोबत मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणारी शमसीयाने आता देशात कुणीच मारले जाणार नसल्याचा विश्वास असल्याचे म्हटले आहे. तालिबान अफगाणी महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देईल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. हजारा समुदायाचे लोक शिया असल्याने तालिबानकडून त्यांना लक्ष्य केले जाते.









