रत्नागिरीतून 883 गाडय़ांचे नियोजन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लालपरीला चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी गावी येताना एसटीकडे पाठ फिरवणाऱया चाकरमान्यांनी परतीसाठी मात्र लालपरीलाच पसंती दिली. 23 ते 31 ऑगस्टपर्यंत जिल्हय़ातून तब्बल 18 हजार 60 चाकरमानी एस.टीने मुंबईला परतल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. य़ांमुळे महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागले. टप्याटप्याने ही सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र बसमध्ये केवळ 22 प्रवाशांच्या मर्यादेमुळे व कोरोनाच्या भीतीने कमी प्रतिसाद याचाही उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
गणेशोत्सावाच्या पार्श्वभुमीवर अंतिम क्षणी सरकारने चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी एसटी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र त्याआधीच अनेक गणेशभक्तांनी खासगी वाहने व खासगी बसचा आधार घेतल्याने एसटी बसना अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा मुंबईला परतण्यासाठी चाकरमान्यांनी आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या एसटीलाच पसंती दिल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसात जिल्हय़ातून मुंबईकडे 833 गाडय़ा रवाना झाल्या असून 31 ऑगस्टपर्यंत 18 हजार 60 चाकरमानी मुंबईला पोहोचले आहेत.
रत्नागिरी एसटी विभागाने गणेशोत्सव काळात वाहतुकीचे उत्तम नियोजन केले आहे. एस.टीचे चालक व वाहक या कठीण परिस्थितीतही सेवा देत आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून एसटीकडील प्रवाशांचा ओढा वाढत असून याचे श्रेय कर्मचाऱयांच्या मेहनतीला असल्याचे विभाग नियंत्रक भोकरे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला जेमतेम 5 हजार चाकरमानी एस.टी ने दाखल झाले होते. मात्र, परतीच्या प्रवासाला 8 दिवसांतच चौप्पट प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये 244 गाडय़ांचे ग्रुप बुकींग झाले. अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनानंतर गाडय़ांची मगणी वाढण्याची शक्यता गृहित धरून महामंडळ सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर जिल्हय़ातील बसेस वाढवणार
रत्नागिरी जिल्हय़ातून इतर जिल्हय़ात बसेस सोडण्याचे प्रमाण टप्याटप्याने वाढवण्यात येणार आहे. सध्या केवळ मुंबई, कोल्हापूर, सांगली, मिरज या मार्गावर काही फेऱया सुरू आहेत. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने इतर मार्गावर फेऱया सुरू करण्यात आलेल्या नाहीत. शहर बससेवा सुरू करण्याबाबत महामंडळाकडून सूचनेची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिक कामाशिवाय बाहेर पडत नसल्याने एस.टी. सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.









