शनिवार, 24 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ : 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम : 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक पात्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पात्र लाभार्थींना 24 एप्रिलपासून लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही नोंद केंद्र सरकारच्या कोविन ऍप आणि cowin.gov.in या वेबसाईटवर करता येणार आहे. तसेच आरोग्य सेतू ऍपवरील ‘व्हॅक्सिनेशन’ या ऑप्शनमध्ये जाऊनही नोंदणी करता येते.
देशात 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार असून त्यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱया टप्यात 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मे महिन्यापासून वयोमर्यादेत घट करून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे.
ऑनलाईन नोंदणी कशी करावी !
- लसीकरणासाठी दोन पद्धतीद्वारे रजिस्ट्रेशन करता येते.
- मोबाईल/कॉम्प्युटरवर cowin.gov.in साईटवर जावे.
- मोबाईलवर आरोग्य सेतू ऍपवरूनही नोंदणी करता येते.
- सर्वप्रथम आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा लागेल.
- नंतर मोबाईलवर आपल्याला एसएमएसद्वारे ओटीपी येईल.
- ओटीपी टाकल्यावर पुढे ओळखपत्राचा नंबर टाकावा.
- (उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट ई.)
- नंतर आपल्याला आपले संपूर्ण नाव टाकायला हवे.
- आपण पुरुष किंवा स्त्री पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
- नंतर लाभार्थीला आपले जन्माचे वर्ष टाकावे लागेल.
सर्व माहिती सबमीट केल्यावर ‘नोंदणी पूर्ण’चा मेसेज येतो. लसीकरणानंतर सर्टिफिकेटही याच पद्धतीने मिळवता येईल.









