अभ्यासू साहित्यिकांची मांदियाळी लाभणार : चार सत्रात संमेलनाचे आयोजन : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे-संमेलनाध्यक्षपदी
वार्ताहर /कुद्रेमनी
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागील दोन वर्षे कुद्रेमनी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने झालेले मराठी साहित्य संमेलन संबंधित नियमावलींचे पालन करून साधेपणाने झाले. यंदाचे 17 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 15 जानेवारी रोजी कुद्रेमनी हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या पटांगणात कै. परशराम मि. गुरव साहित्यनगरीत चार सत्रात होणार आहे. अभ्यासू साहित्यिकांची मांदियाळी या संमेलनात सहभागी होत आहे.
त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे-संमेलनाध्यक्ष

सांगली जिल्ह्यातील चरण हे जन्मगाव. प्रसिद्ध कवी, आत्मचरित्रकार, पत्रकार, राजकीय विश्लेषक, प्राध्यापक, अनेक पुरस्कारांचे मानकरी व अनेक वर्षांपासून अनेक साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून प्रबोधन करणारे साहित्यिक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. या साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मराठी विषयातून एमए पदवी, पत्रकारितेची उच्चपदवी संपादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून बाबुराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान, विषयावर पीएचडी संपादन केली आहे.
प्रा. एन. डी. पाटील-‘माझी संघर्ष यात्रा’, अभिनेते-चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचेवर ‘देवाशपथ खरे लिहिन’, शाहीर पिराजीराव सरदेसाई यांचेवर ‘मुजरा’ व ‘ओल्डमॅन ईन वॉर’ हे शरद पवार यांच्यावरील त्यांची आत्मचरित्र लेखनकृती प्रसिद्ध आहे. पापण्यांच्या शोधात, शहर मातीच्या शोधात, स्तंभसुक्त आत बाहेर सर्वत्र इ. त्यांच्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारने इंदिरा संत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागात 9 वर्षे मानद अध्यापक होते. राजर्षि शाहू चरित्रसाधने समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
एनडीटीव्ही, झी 24 तास, साम, एबीपी माझा, टीव्ही-9, लोकशाही अशा विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून चर्चेत त्यांचा सहभाग आहे. स्त्री सत्तेची पहाट हे त्यांचे महिलांच्या बाबतीतले संशोधन आहे. आयुष्यातील अनेक वर्षे त्यांनी पत्रकारितेमध्ये घालविली.
दिल्लीच्या बिर्ला फौंडेशनची फेलोशिप, केंद्र शासन ग्रामीण विकास मंत्रालयाची फेलोशिप, पुण्याच्या भिडे प्रतिष्ठानचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव पत्रकारितेचा पुरस्कार, पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी भा. रा. तांबे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानीत झाले आहेत.
आबासाहेब पाटील (मंगसुळी)

आबासाहेब पाटील हे कवीसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठीतून एमए पदवीधर, वाचन, साहित्य, काव्य निर्मितीचे व्यासंगी व्यक्तिमत्त्व. शेती करण्याची आवड, मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
सांगली-कोल्हापूर आकाशवाणीवरून त्यांचे नेहमी काव्यवाचन असते. चतुरंग, प्रतिभा, कृष्णाकाठ इ. दिवाळी अंकांतून त्यांचे काव्यलेखन प्रसिद्ध झाले आहे. सीमाभागात होणाऱ्या अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक ठिकाणी कवी संमेलनाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. आपल्या मंगसुळी गावात मराठी काव्य संमेलनाचे नव्याने आयोजन त्यांनी केले आहे. कॉलेज, शिक्षण संस्था, वाचनालये आदींच्यावतीने आयोजित कार्यक्रमात कवी म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
सांगलीचा कवी सुधांशु पुरस्कार, इस्लामपूरचा कवी कालिदास, म. ल. पाटील कुरुंदवाड पुरस्कार, सृजनशील साहित्यिक शंकर पाटील पुरस्कार, सुब्रह्मण्यम् साहित्य पुरस्कार-बेळगाव, बाळशास्त्री जांभेकर साहित्य सेवा पुरस्कार-इचलकरंजी आदी अनेक पुरस्कारांनी ते सन्मानीत आहेत.
कवी थळेंद्र लोखंडे

कवी संमेलनात सहभागी कवी आहेत. सातारा, कराड तालुक्यातील मनव हे त्यांचे गाव. राज्यशास्त्र डिप्लोमा, शाहिरीमध्ये एमए पदवीचे शिक्षण घेतले. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच दूरदर्शनवर त्यांचे काव्यवाचन होत असते. महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक, चेन्नईत त्यांनी काव्यवाचन केले आहे. नऊ हजारपेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत.
कवी अमृत हु. पाटील

कुद्रेमनी जन्मगाव. नवोदित कवी व अध्यात्माचे व्यासंगी आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए पदवीधर झाल्यानंतर कर्नाटक म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजी एमए पदवीधर झाले. सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा करतात. चित्रकला व इंग्रजी विषयाचे संपन्मूल (आरपी) प्रतिनिधी आहेत.
विविध ग्रंथ, पुस्तकांचे वाचन, मनन करतात. उत्कृष्ट चित्रकार, मूर्तिकार आहेत. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातून हरीपाठ प्रवचन, कीर्तनाची सेवा करतात. अनेक कवितांचे कानडीमध्ये भाषांतर केलेले आहे. भविष्य शोधताना हा त्यांचा प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह आहे.
हर्षदा सुंठणकर

या बेळगावच्या कवयित्री आहेत. त्या काव्यनिर्मितीच्या व्यासंगी आहेत. वरेरकर नाट्यासंघ बेळगावतर्फे ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या प्रसिद्ध त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांचे ‘अस्तित्वाचे मृगजळ’ या नावाने नाट्या अभिवाचन प्रयोग झाले.
‘बाई’ ही कविता स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या आणि मध्यप्रदेशात बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूळकर यांच्याकडून त्यांची अभिवाचन चित्रफीत सादर करण्यात आली आहे.
2017 साली डोंबिवली येथे झालेल्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवे कवी नवी कविता’ सत्रात काव्यवाचन केले.
रोटरी पुरस्कार, ज्ञानक्रांती करंडक पुरस्कार, मंथन महिला संमेलन पुरस्कार, आयुष्याचे प्रतिबिंब मराठी वेली पुरस्कार, कालिदास वृत्त छंद पुरस्कार आदी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. सह्याद्री वाहिनीवरील शर्यत दे आपुली या विसुभाऊ बापट निर्मित कार्यक्रमात त्यांनी कवितांचे अभिवाचन केले. मौज, दीपावली, हंस आदी दिवाळी अंकांतून त्यांच्या अनेक भावस्पर्शी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
संमेलनाच्या उद्घाटक-सरस्वती पाटील

सरस्वती रामचंद्र पाटील यांच्या हस्ते यंदाच्या 17 व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी हे त्यांचे गाव. समाजहिताच्या कार्यासाठी स्वत:ला त्यांनी झोकून दिले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीच्या त्या माजी सदस्या असून मराठी भाषा संस्कृती संवर्धनासाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
बाबा परीट

सांगली-शिराळा तालुक्यातील बीळासी हे त्यांचे मूळ गाव. उत्कृष्ट कथाकार व कवी म्हणून त्यांची ओळख आहे. दारुबंदी चळवळ रुजविण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे. दीड हजारहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम सादर करून प्रबोधन केले आहे. त्यांच्या ‘शिकार’ कथेवर लघुपट निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, चेन्नई तसेच देश-विदेशात कथाकथनांचे त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगली, पुणे, ठाणे, चिपळूण, डोंबिवली, नाशिक इ. ठिकाणी निमंत्रित कथाकार म्हणून कथाकथन केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे केशवसुत स्मृतीकाव्य स्पर्धेत ‘वृत्तपत्रात’ या त्यांच्या कवितेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. सिंगापूर येथील तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनात ते निमंत्रित कथाकार होते.
आत्माराम पाटील

कोल्हापूर, आजरा तालुक्यातील गजरगाव हे त्यांचे मूळ गाव. ते सिनेनाट्या अभिनेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. अनेक नाटके, एकांकिका, चित्रपट, वेबसिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय त्यांनी केले आहे. 2021 चा इचलकरंजी एकांकिका उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. 61 वी हौसी राज्य नाट्या स्पर्धा 2022 कोल्हापूर केंद्र येथे ‘एक्सपायरी डेट’ या त्यांच्या नाटकास विशेष उत्कृष्ट अभिनय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मिमिक्री करण्यात त्यांचा हातखंडा आहे. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘आनंदाने जगूया’ विषयावर ते प्रबोधन करणार आहेत.









