पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची विधानसभेत माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
पावसामुळे पूर्ण प्रमाणात घर कोसळलेल्या कुटुंबांना 24 तासांच्या आत मदतीची रक्कम दिली जात आहे. इतक्या प्रमाणात मदत यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात देण्यात आलेली नाही. आपल्या सरकारने 2019 मध्ये पडझड झालेल्या 46,959 घरांसाठी 828.67 कोटी रुपयांची मदत दिली आहे. 2019 मध्ये बेळगाव जिल्हय़ाला 120.05 कोटी रुपये देण्यात आले होते. एका जिल्हय़ासाठी इतक्या प्रमाणातील निधी मागील 75 वर्षांमध्ये कोणीही दिले नाही. तीन वर्षांत बेळगाव जिल्हय़ाला 1,726 कोटी रु. देण्यात आले आहेत, अशी माहिती पाटबंधारे मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी विधानसभेत दिली.
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नुकसानीसाठी सरकारने दिलेल्या अनुदानाची माहिती मंत्री गोविंद कारजोळ यांनी मंगळवारी विधानसभेत सादर केली. पावसामुळे झालेल्या पीकहानीची माहिती घेण्यासाठी, सर्वेक्षण करण्यासाठी शेतांमध्ये जाणे शक्य झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा अंदाजे तपशिल जमा करण्यात आला आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी जमीन कोरडी असणे आवश्यक आहे, असे कारजोळ यांनी सांगितले.
त्यावेळी कारजोळ यांचे बोलणे मध्येच थांबवत आमदार शिवानंद यांनी, पहिल्या टप्प्यातील मदतनिधी देण्यात आला आहे. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील मदतनिधी तातडीने मंजूर करावा, अशी विनंती केली. त्यावर उत्तर देताना मंत्री कारजोळ म्हणाले, पावसामुळे घरे पडलेल्यांकडून नव्याने बांधकाम सुरू असल्यास टप्प्याटप्प्यानु अनुदान दिले जात आहे. मदतनिधी देण्यासाठी सरकारजवळ पुरेसा पैसा आहे. बेळगाव जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या खात्यांमध्ये निधी शिल्लक आहे. अनुदानाची कमतरता नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सिद्धरामय्यांकडून सरकार फैलावर
राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये यंदा अंदाजापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने कोणतीही पूर्वखबरदारी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारला फैलावर घेतले. राज्यातील अतिवृष्टीवरील चर्चेसाठी सभाध्यक्षांनी तीन तास वेळ दिल्यानंतर नियम 69 अंतर्गत बोलताना सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे भात उत्पादनात 5.6 टक्के, नाचणा उत्पादनात 12 टक्के, हरभरा 19.2 टक्के, शेंगा 9.6 टक्के आणि सोयाबिन उत्पादनात 20.6 टक्के घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती राज्य सरकारने कोणत्या पर्यायी उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
तातडीने 600 कोटी रु. मंजूर ः बोम्माई
राज्यात अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून तातडीने मदतकार्य हाती घेण्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेत दिली आहे. प्रश्नोत्तर चर्चेवेळी आमदार महादेव के. यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्माई यांनी उत्तर दिले. राज्यात यंदा पावसामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 300 कोटी रु. आणि ग्रामविकास-पंचायतराज खात्याकडून 300 कोटी रु. असे एकूण 600 कोटी रुपये तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास आणि पंचायतराज, महसूल खात्यासह विविध खात्यांशी संबंधित पायाभूत सुविधांची हानी झाली आहे. त्यामुळे अधिकाऱयांना दोन टप्प्यात नुकसानीबाबत सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी तातडीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती आणि मदतकार्य हाती घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना केली आहे, अशी माहितीही बोम्माई यांनी दिली.









