काँग्रेस नेते अजय माकन यांचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आल्याने राजकीय वाक्युद्ध सुरू आहे. निवासस्थानाकरता वारेमाप खर्च केल्याने केजरीवालांना अन्य राजकीय पक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. केजरीवालांच्या निवासस्थानच्या सौंदर्यीकरणावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. तर आता काँग्रेसने केजरीवाल यांच्या बंगल्यावर 45 कोटी नव्हे तर 171 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर खर्च करण्यात आलेली रक्कम 171 कोटी रुपये होती. दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त फ्लॅट खरेदी करावे लागले, तर निवासस्थानाच्या विस्तारासाठी परिसरात अनेक बांधकामे पाडावी लागली किंवा रिकामी करावी लागली आहेत असा आरोप काँग्रेसने रविवारी केला आहे.
केजरीवाल हे साध्या राहणीमानाचा बनाव करत आहेत. स्वत:च्या निवासस्थानावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याचे कृत्य केजरीवालांनी केले आहे. काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाने स्वत:च्या शासनकाळात 15 वर्षांमध्ये निवासस्थानांवर जितका खर्च केला नाही, त्याहून अधिक केजरीवालांकडून स्वत:च्या महालाच्या नुतनीकरणासाठी खर्च करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात लोक रुग्णालयात बेड अन् ऑक्सिजन अभावी तडफडत असताना केजरीवालांनी स्वत:च्या निवासस्थानाकरता 171 कोटी रुपये खर्च केले आहेत. केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाशेजारी 4 निवास परिसर आहेत. या 4 निवास परिसरांमध्ये एकूण 22 अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. 22 पैकी 15 फ्लॅट रिकामी करविण्यात आले किंवा ध्वस्त करण्यात आले आहेत. तर उर्वरित 7 फ्लॅट वितरित न करण्याचा निर्देश केजरीवालांकडून देण्यात आला आहे. या फ्लॅट्सच्या भरपाईसाठी केजरीवाल सरकारने राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये 126 कोटी रुपये खर्चून टाइप 5 चे 21 फ्लॅट खरेदी केले आहेत. याचमुळे या 21 फ्लॅट्सची किंमत केजरीवालांच्या निवासस्थानावर खर्च करण्यात आलेल्या एकूण रकमेत सामील करण्यात यावे. सरकारने अर्थसंकल्प संमत करविला, परंतु केजरीवालांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणाचा यात कुठलाच उल्लेख नाही, केजरीवाल सरकारचे हे कृत्य विशेषाधिकाराचा भंग करणारे असल्याचा दावा माकन यांनी केला आहे.









