खंडेराजुरी / रवीकुमार हजारे :
चालू वर्षाच्या बेदाणा हंगामामध्ये १७ हजार गाडी (एक लाख ७० हजार टन) इतके उत्पादन झाले असून. सध्या आज अखेरीस १३ हजार गाडी बेदाणा सांगली, तासगाव, पंढरपूर येथील कोल्ड स्टोरेज मध्ये बंदिस्त झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के आवक कमी आली असून दर मात्र २४० ते ३०० रुपये प्रति किलो उच्चांकी मिळत आहे. संपूर्ण देशामध्ये सांगली जिल्हा हा द्राक्ष व बेदाणा उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली, तासगाव, पंढरपूर परिसरात तब्बल १३० कोल्ड स्टोरेज आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा बेदाणा दराच्या प्रतीक्षेसाठी बंदिस्त केला जातो.
२०२३ साली विक्रमी असे २८ हजार गाडी उत्पादन झाले होते. त्यावेळी जगात बेदाणा उत्पादकामध्ये भारत देश प्रथम क्रमांकावर आला होता. गतवर्षी २०२४ साली तेवीस हजार गाडी बेदाण्याची आवश्यक होती. त्यामुळे गेले दोन वर्ष सव्वाशे ते दीडशे रुपये प्रति किलो बेदाणा विक्री होत होती. शेतकऱ्यांचा झालेला खर्च सुद्धा निघत नव्हता.
तरीही शेतकऱ्यांनी चालू वर्षी द्राक्ष बागा चांगल्या पिकवल्या. पण फ्लावरिंग व पोंगा स्टेजमध्ये दिवाळीच्या दरम्यान झालेल्या पावसाने मिरज, तासगाव, कवठेमंकाळ, जत, अथणी, विजापूर, नाशिक, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बार्शी परिसरातील द्राक्ष बागेतील माल गळून पडला. अनेक बागा फ्लॉवरिंग मध्ये मोकळ्या झाल्या. त्यामुळे शेतकरी हताश व कर्जबाजारी झाला. घेतलेले कर्ज, मुलांचे शिक्षण, घर खर्च, औषधे हे कसे चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला.
द्राक्ष पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नोव्हेंबर २४ पासूनच द्राक्षाला दोनशे ते पाचशे रुपये पेटी (चार किलो) असा विक्रमी दर मिळत होता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात चांगले वातावरण व कुंभमेळावा असल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष खाण्यासाठी गेली.
गेल्या दोन वर्षातील बेदाण्याचे दर पाहता शेतकऱ्यांनी २०० ते ३०० रुपये पेटी द्राक्षे विक्री करण्यास पसंती दिली. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन नक्की कमी होणार,गतवर्षपिक्षा ५० टक्के बेदाणा येणार असा व्यापाऱ्यांनी अंदाज बांधला. त्यामुळे चालू हंगामात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रति किलो २००रु. पासून पुढे दर वाढण्यास सुरुवात झाली.
मार्च महिन्यात तर सरासरी २६० ते ३०० रुपये असा दर मिळत होता. तर काही चांगल्या उच्च प्रतीच्या बेदाण्याला ४५१. ५५१, ७०१ असा भाव मिळाला.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी दोनशे, अडीचशे रुपये दर मिळाल्याने मार्च व एप्रिल महिन्यात बहुतांशी बेदाणा विक्री करणे पसंत केले. होळी व रमजान या सणासाठी देशभर मागणी होती.
व्यापाऱ्यांनी मात्र बेदाणा कमी आहे याचा अंदाज बांधून मोठ्या प्रमाणात बेदाणा खरेदी करून कोल्ड स्टोरेज मध्ये उंच दराच्या प्रतीक्षेत ठेवलेला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी उत्पादनाचा अंदाज घेऊन फेब्रुवारीमध्ये बेदाणा घेऊन मार्च, एप्रिल मध्ये विक्री केली आहे. अनेक व्यापारी तीनशे रुपये दर होणार असे सांगत आहेत
पंढरपूर, सोलापूर, कर्नाटकचा काही भागात एप्रिल महिन्यात द्राक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने द्राक्षाचे मार्केटिंग झाले नाही. त्याच द्राक्षाचा बेदाणा झाल्याने हजार, पंधराशे गाडी बेदाणा आवक झाली. बेदाण्याचे आवक १६ ते १७ हजार गाडी झाल्याचा अंदाज आल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बेदाण्याचे दर सुद्धा २५ ते ३० रुपयांनी खाली आले आहेत. दर कमी आल्याने अडत्याला पेमेंट सुद्धा पन्नास, साठ दिवसानंतर मिळत आहे.
- सध्या ग्राहक कमी ..
सध्या युद्ध परिस्थिती असल्याने, सण व मागणी नसल्याने बेदाण्याला ग्राहक कमी आहेत. त्यामुळे दर कमी आले असून गणपती व दिवाळीसाठी ग्राहक निघाल्यानंतर पुन्हा दर वाढतील असे बेदाणा असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.
- चालू बेदाणा दर..
सध्या चांगला हिरवा गोल बेदाणा २४० ते २७० रुपये प्रति किलो
मध्यम बेदाणा १७० ते २३० रुपये.
सुंटेखाणी लांब बेदाणा २७० ते ३०० रुपये काळा बेदाणा ८० ते १४० रुपये.
पिवळा बेदाणा २२० ते २७० रुपये प्रति किलो असा दर आहे.








