अमेरिकेच्या तपास यंत्रणांना आणले होते जेरीस
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सुमारे 17 वर्षांपर्यंत बॉम्बस्फोट घडवून आणत अमेरिकेला जेरीस आणणारा दहशतवादी आणि गणिताचा प्राध्यापक थियोडरे काजिंस्कीचा मृत्यू झाला आहे. 81 वर्षीय कांजिस्की हा निरपराध लोकांचा जीव घेतल्याप्रकरणी दोषी ठरल्यावर 1996 पासून तुरुंगवास भोगत होता.
काजिंस्की शनिवारी स्वत:च्या कोठडीत मृत आढळून आला आहे. तो दीर्घकाळापासून आजारी होता. अमेरिकेत काजिंस्कीला टेड आणि उनाबॉम्बर या नावाने ओळखले जात होते. तो स्वत: जंगलांमध्ये राहून बॉम्ब तयार करायचा आणि त्यांचा स्फोट देखील एकट्याने घडवून आणायचा.
अत्यंत हुशार
शिकागोचा रहिवासी असलेल्या टेड काजिंस्कीला पकडण्यासाठी एफबीआयने स्वत:च्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अन् महाग चौकशी केली होती. काजिंस्की हा हार्वर्ड विद्यापीठात शिकला होता आणि कॅलिफोर्नियामध्ये गणिताचा प्राध्यापक होणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती ठरला होता. परंतु 30 जून 1969 रोजी टेडने राजीनामा दिला होता आणि त्यानंतर तो मेंटानाच्या जंगलांमध्ये झोपडीत तयार करून तेथे राहू लागला होता. काजिंस्कीचा आयक्यू लेव्हल 167 इतका होता. 130 आयक्यू लेव्हल असणाऱ्या लोकांनाच अत्यंत कुशाग्र मानले जाते. अशा स्थितीत 167 आयक्यू लेव्हल असणाऱ्या काजिंस्कीला गणितात मोठे प्राविण्य प्राप्त होते.
1978-95 पर्यंत अमेरिकेत हल्ले
1978 मध्ये त्याने अमेरिकेत बॉम्बस्फोट घडवून आणण्यास सुरुवात केली. 1995 पर्यंत त्याने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. काजिंस्की हा निशाण्यावर असलेल्या लोकांना पोस्टाद्वारे देखील बॉम्ब पाठवत होता. तपास यंत्रणांच्या तावडीत सापडू नये म्हणून तो इतर लोकांच्या फिंगर प्रिंट्सचा वापर करायचा. अमेरिकन एअरलाइनच्या विमानात त्याने बॉम्ब ठेवला होता, परंतु या बॉम्बचा स्फोट न झाल्याने मोठी जीवितहानी टळली होती.
वृत्तपत्रांमध्ये मॅनिफेस्टो प्रसिद्ध
काजिंस्कीने 1995 मध्ये अमेरिकेतील आघाडीची वृत्तपत्रं न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्वत:चा मेनिफेस्टो प्रसिद्ध करविला होता. हा मेनिफेस्टो 35 हजार शब्दांचा होता, यात त्याने आधुनिक जगाच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तंत्रज्ञानामुळे अमेरिकेचे लोक कमजोर होत असल्याचे काजिंस्कीला वाटत होते. मेनिफेस्टो प्रसिद्ध झाल्यावर काजिंस्कीचा भाऊ अन् वहिनीने त्याची लिखाणशैली ओळखली आणि याची माहिती एफबीआयला दिली होती. यामुळेच एप्रिल 1996 मध्ये तो पकडला गेला होता. काजिंस्कीला आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती.