कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अधिसभेत 77 ठराव मांडण्यात आले. डॉ. निवासराव वरेकर यांनी मांडलेल्या ठरावात विद्यापीठाच्या देय बनावट पावत्या सादर करून विद्यापीठाची फसवणूक करणाऱ्या संलग्नित महाविद्यालयाची निवृत्त न्यायालयामार्फत चौकशी करा, अशी मागणी केली. एका संलग्नित महाविद्यालयाने बनावट पावत्या दाखवून कोट्यावधीची फसवणूक केली. यासह अन्य ठरावांवरील चर्चेदरम्यान प्रश्न विचारून अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. वादळी चर्चेनंतर 77 पैकी 17 ठराव मंजूर झाले. तर 60 ठराव मागे घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
शिवाजी विद्यापीठांतर्गत एका महाविद्यालयाने खोट्या पावत्या सादर करून कोट्यावधीची फसवणूक केली. अशी किती महाविद्यालय असून किती कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे, असा प्रश्न विचारून विद्यापीठ प्रशासनाला अधिसभा सदस्यांनी घाम फोडला. आईस हॉकीची स्पर्धा घेण्याचे नियोजित केले आहे. परंतू या क्रीडा प्रकारात कोल्हापुरातील खेळाडू नसताना ही स्पर्धा कोणासाठी घेतली आहे, असा जाब श्वेता परुळेकर यांनी प्रशासनाला विचारला. डॉ. ज्ञानदेव काळे यांनी मांडलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व अधिविभाग व महाविद्यालयांमध्ये 2018 ची युजीसीची नियमावली जशीच्या तशी लागू करावी. या ठरावावर मतदान घेऊन ठराव मंजूर केला. प्रत्येक ठरावावर समाधान होईपर्यंत चर्चा केली. त्यानंतर ठराव मंजूर, नामंजूर की मागे घ्यायचा हे ठरवले. बहुतांश ठरावावर अधिसभा सदस्य व प्रशासनामध्ये वादावादी झाली. महाविद्यालयाच्या संलग्निकरणाच्या फीमध्ये दर तीन वर्षांनी 20 टक्के वाढ होते. ही दरवाढ सहा वर्षांनी 20 टक्के करावी, असा ठराव डॉ. मंजिरी मोरे यांनी सभागृहासमोर मांडला. यावर बराचवेळ चर्चा झाली. काही ठराव गतवर्षीचे किंवा किरकोळ चुका असल्यावरून मागे घ्यावे लागले. अधिसभा सदस्य व प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक झाली. डॉ. माधुरी सावंत, श्रीनिवास गायकवाड, डॉ. मनोजकुमार पाटील, डॉ. प्रकाश कुंभार, मंजिरी मोरे, डॉ. शशिभूषण महाडिक, डॉ. निवासराव वरेकर, श्वेता परुळेकर, संजय परमणे, ज्ञानदेव काळे आदींनी ठराव मांडले. विद्यार्थी हिताचे ठराव मंजूर केले. सकाळी 10 वाजता सुरू झालेली अधिसभा रात्री 10 वाजता संपली. म्हणजे अधिसभा तब्बल बारा तास सुरू होती. प्र–कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे सभेच्या सचिवपदी होते.
मान्य झालेले काही ठराव
एका प्राध्यापकाला किती प्रश्नपत्रिका काढण्यास सांगाव्या त्याचा आकडा ठरवा, महाविद्यालयाच्या प्रवेश पत्रिकेत विद्यापीठांच्या योजनांचा समावेश करावा. स्पोटर्स कॉम्प्लेक्ससंदर्भात राज्य व केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या चहू बाजूंनी प्रकाश झोत टाकावा. नवीन शैक्षणिक धोरणासाठी नेमलेल्या कुलकर्णी समितीच्या शिफारशीनुसार विविध विषयांच्या तुकडीमधील विद्यार्थी संख्या निश्चित करा. यासह अन्य महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.








