राष्ट्रपती-पंतप्रधानांची उपस्थि ती : तीन वर्षीय बुद्धिबळपटू अनिश सरकारचे विशेष कौतुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 17 मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये 7 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. गौरवित केलेल्या पुरस्कार्थींमध्ये कोलकाता येथील बाल बुद्धिबळपटू अनिश सरकारचा समावेश आहे. त्याचे वय 3 वर्षे आठ महिने आणि 19 दिवस आहे. वर्ल्ड चेस फेडरेशन रँकिंग मिळवणारा तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे.
26 नोव्हेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गुरुवारी बाल वीरता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय बाल पुरस्कार सात श्रेणींमध्ये दिले जातात. यामध्ये कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. यंदाच्या या पुरस्कार विजेत्यांमध्ये क्रीडा प्रकारात 3 वर्षीय अनिश सरकार याचा समावेश होता. तसेच राष्ट्रपती मुर्मू यांनी बिहारच्या नालंदा येथील गोल्डी कुमारीला बाल पुरस्कार प्रदान केला. दिव्यांग गोल्डीने थायलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅराऑलिम्पिक युथ गेम्समध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले होते. त्याव्यतिरिक्त बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील सौरभ कुमार याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 9 वर्षीय सौरभने तीन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचवले होते.
पंतप्रधानांनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मोदींनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची भेट घेतली. जर आपण विशेष कौशल्यावर काम केले तर आपण जगात सर्वोत्तम होऊ. जर तुम्ही अवकाश क्षेत्रात काम करत असाल तर जगातील सर्वोत्तम व्हा. सर्वोत्तम हे आमचे मानक असावे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी याप्रसंगी केले. तसेच पुरस्कार वितरणानंतर पंतप्रधानांनी विजेत्यांशी थेट संवादही साधला. यावेळी त्यांनी मुलांना अनेक प्रश्नही विचारले. या भेटीत पंतप्रधानांनी मुलांची तब्येतीची विचारपूसही केली. पंतप्रधान मोदींना भेटून मुलांनाही खूप आनंद झाला. दिव्यांग मुलांनीही आपले विचार पंतप्रधानांसमोर विषद केले. पंतप्रधान त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. यावेळी त्यांनी एका चिमुरडीशी बराच वेळ गप्पा मारल्या. दोन दिव्यांग मुलांशी पंतप्रधान प्रेमाने बोलताना दिसले. पंतप्रधानदेखील एका दिव्यांग मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन देताना दिसले.









