ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारीही या रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री मृत्यू झालेल्या 17 रुग्णांमधील 13 रुग्ण हे आयसीयूमध्ये तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होते. काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारीही या रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. उपचाराअभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता.








