पहिल्याच दिवशी 17 उमेदवारी अर्ज दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी 13 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 18 मतदारसंघांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली असून पहिल्या दिवशी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 13 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले आहेत. निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दोन अर्ज तर धनश्री पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत.
अथणी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्यावतीने संपतकुमार शेट्टी तर कर्नाटक राष्ट्र समितीचे सागर कुंभार यांनी उमेदवारी अर्ज भरला असून आझाद मजदूर किसान पार्टीच्यावतीने संजीव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोकाक मतदारसंघात माजीमंत्री रमेश जारकीहोळी यांनी भाजपचे उमेदवार म्हणून पहिल्याच दिवशी दोन अर्ज भरले आहेत.
खानापूर मतदारसंघातून रुद्रगौडा बाबूगौडा पाटील यांनी अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर कल्याण राज्य प्रगती पक्षाच्यावतीने राजकुमार कल्लाप्पा पुजारी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कित्तूर मतदारसंघातून करुनाडू पार्टीचे बोदय्या पुजेरी, बैलहोंगल मतदारसंघात कर्नाटक राष्ट्र समितीचे इरफान बागेवाडी, सौंदत्ती मतदारसंघात कल्याण राज्य प्रगती पक्षाचे मल्लिकार्जुन चन्नाप्पा मेळगेरी तर याच मतदारसंघातून कर्नाटक राष्ट्र समितीच्यावतीने पराप्पा अंटकण्णावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
रामदुर्गमधून कर्नाटक राष्ट्र समितीच्यावतीने बसाप्पा गुरुसिद्धाप्पा कुंभार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या दिवशी रमेश जारकीहोळी वगळता राष्ट्रीय पक्षाच्या इतर उमेदवारांनी अर्ज भरला नाही.









