पुणे / वार्ताहर :
पामतेलाचे 1100 डबे 1570 रुपये प्रति डब्याप्रमाणे देण्याच्या बहाण्याने दोघांनी पुण्यातील एका व्यावसायिकाची 17 लाख 27 हजारांची फसवणूक केल्याचा प्रका र समोर आला आहे.
याप्रकरणी भरत आरोरा आणि हर्बन्सलाल अरोरा यांच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्वरी हुकुमचंद गोयल (वय 61, रा. बिबबेवाडी, पुणे) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत आरोरा आणि हर्बन्सलाल अरोरा हे प्रिशा जेएमडी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. त्यांनी तक्रारदार सत्वरी गोयल यांना पामतेलाचे 1100 तेलाचे डबे प्रति डबा 1570 रुपये प्रमाणे पोहच करतो असे सांगितले. ठरलेल्या मालाचे बिल देऊन त्यांचा विश्वास संपादन करून बँक खात्यावर 17 लाख 27 हजार रुपये जमा करुन घेतले. त्यानंतर आरोपींनी 1100 ऐवजी 2200 पामतेलाचे डबे पाठवीत असल्याचे बिल पाठवले तसेच आणखी 17 लाख 27 हजार रुपये जमा करा, तरच माल पाठवतो, असे सांगितले. व्यावसायिकाला ठरल्याप्रमाणे पामतेलाचे डबे न देता, तसेच पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस कांबळे करत आहेत.









