शिरूरच्या हजारेंची बैलजोडी दुसरी : सावकारप्रेमी शर्यत शौकिनांची प्रचंड गर्दी : 64 लाखांचे बक्षीस वितरण
वार्ताहर /एकसंबा
बैलगाडी शर्यती आयोजनाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त अंतरराज्य पातळीवरील भव्य विना लाठी-काठी बैलगाडी शर्यती पार पडल्या. जवळपास 10-12 वर्षापूर्वीचा तोच थरार, तोच रुबाब, तेच मैदान, तशीच लाखोंची बक्षिसे, हजारो शर्यती शौकिनांच्या तुफानी जनसागर, सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा तसेच डोळ्याची पारणे फेडणारा ऐतिहासिक 64 लाख रुपयांच्या बैलगाडी शर्यतीचा थरार पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाला. संदीप पाटील कोल्हापूर यांचा हिंदकेसरी हरण्या प्रथम बक्षीस असलेल्या 17 लाखाचा मानकरी ठरला असून काही मिनिटांच्या फरकाने या पट्ट्याने सावकार शर्यतीचे मैदान गाजवले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी बैलगाडी शर्यत म्हणून एकसंबा गावाच्या शर्यती याची देही याची डोळा असच अनुभव पहावयास मिळाला. माजी मंत्री, कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलिकवाड माळावर भव्य शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले होते. एकूण 3 विभागात बैलगाडी शर्यती होत्या. यामध्ये अ श्रेणीसाठी एकूण 33 लाख, ब श्रेणीसाठी 18 लाख तर क श्रेणीसाठी एकूण 13 लाख अशा एकूण 64 लाख रुपयाची बक्षिसे आयोजिली होती. प्रारंभी आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडी शर्यतींना चालना देण्यात आली.
- अ श्रेणीतील बैलगाडी शर्यतीसाठी 13 गाड्या, ब श्रेणीतील बैलगाडी शर्यतीसाठी 10 गाड्या, क श्रेणीतील बैलगाडी शर्यतीसाठी 11 गाड्या अशा एकूण 34 बैलागाड्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये ब श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक बंडा खिलारे दानोळी यांनी पटकावला त्यांना 9 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. द्वितीय क्रमांक राजेंद्र पाटील तासगांव चिंचणी यांनी पटकावला असून त्यांना 5 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. तृतीय क्रमांक महादेव गजबर पाटील मलिकवाड यांनी पटकावला. त्यांना 3 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. चतुर्थ क्रमांक अभिजित देसाई यरगट्टी यांनी पटकावला त्यांना 1 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली.
- क श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक शिवानंद शंकर पुजारी अलकनुर यांनी पटकावला त्यांना 7 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. द्वितीय क्रमांक भीमराव पाटील कोल्हापूर यांनी पटकावला त्यांना 3 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. तृतीय क्रमांक आसिफ कासिम मुल्लानी शिरढोण यांनी पटकावला त्यांना 2 लाखाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देण्यात आली. चतुर्थ क्रमांक शिवानंद करे अटलट्टी यांनी पटकावला. त्यांना 1 लाखाचा धनादेश , शिल्ड व निशाणी देण्यात आली.
गर्दीचा उच्चांक
प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे शर्यती झाल्या नसल्याने जणू यंदा कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून आलेल्या शर्यती शौकिनांची उच्चांक गर्दी पहावयास मिळाली. मलिकवाड माळावर बघेल तिकडे जनसमुदाय पहावयास मिळत होता. सायंकाळी ठीक 4 वाजून 21 मिनिटांनी क श्रेणीतील पहिली बैलगाडी शर्यत सोडण्यात आली. 4 वाजून 47 मिनिटांनी पहिली बैलगाडी अंतिम रेषा पार केली. त्यानंतर 5 वाजून 1 मिनिटांनी मिनिटांनी ब गटातील बैलगाडी शर्यती सोडण्यात आली. 5 वाजून 28 मिनिटांनी पहिली बैलगाडी अंतिम रेषा पार केली. अ श्रेणीतील बैलगाडी शर्यती 5 वाजून 59 मिनिटांनी सोडण्यात आली 6 वाजून 23 मिनिटांनी हिंदकेसरी हरण्याची बैलजोडी अंतिम रेषा पार केली.
हरण्या ठरला मानकरी
17 लाख रुपयाचे मैदान पाहण्यासाठी आलेल्या शर्यती शौकिनांचे हिंदकेसरी हरण्याणे अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडले. अ श्रेणीतील बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून एकसंब्याच्या सावकार शर्यती मैदानावर आपले सोनेरी नाव कोरले आहे. संदीप पाटील कोल्हापूर प्रथम क्रमांक हरण्याचे नाव घेताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते जल्लोषी वातावरणात त्यांना 17 लाख रुपयाचा धनादेश व शिल्ड व निशाणी देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी बंडा सर्जेराव शिंदे दानोळी यांना 9 लाख रुपयाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी बाळासाहेब हजारे शुरुर यांना 5 लाख रुपयाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देऊन गौरविण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकासाठी सागर सूर्यवंशी यांना 2 लाख रुपयाचा धनादेश, शिल्ड व निशाणी देऊन गौरविण्यात आले. अशा एकूण 64 लाख रुपयाच्या शर्यती अमाप उत्साहात व उदंड प्रतिसादात पार पडल्या.









