वृत्तसंस्था/ ऐझॉल
मिझोराममधींल प्रस्तावित सैरंग-शिमुई रेल्वे स्थानकानजीक एक निर्माणाधीन रेल्वे ब्रिज कोसळल्याने झालेल्या अपघातात 17 कामगार ठार झाल्याचे वृत्त आहे. ही दुर्घटना राज्याची राजधानी ऐझॉल पासून 25 किलोमीटर अंतरावर बुधवारी सकाळी घडली. अपघात घडला तेव्हा 40 कामगार या ब्रिजची उभारणी करत होते. दुर्घटनेची माहिती मिझोरामचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनी दिली.
अपघात कसा घडला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिजसाठी स्तंभ बांधताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात 8 कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ब्रिजच्या बांधकामात दोष होता काय याचीही चौकशी केली जाणार आहे. अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. अपघातस्थळी काही बांधकाम अधिकारीही उपस्थित होते. त्यांची चौकशी केली जाणार आहे.
स्थानिकांनी केले साहाय्य
ब्रिज कोसळल्यानंतर सर्वप्रथम स्थानिक नागरीक घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार पडलेल्या ब्रिजखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांचे प्राण नागरीकांच्या साहाय्यामुळे वाचल्याचे वृत्त आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनी नागरीकांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.
प्रथमदर्शनी कारणे
ब्रिजचे बांधकाम करत असताना भुसभुशीत जमिनीमुळे खांब कोसळून ब्रिजचा ढाचा कोसळला, असे प्रथमदर्शनी स्पष्ट करण्यात आले. मात्र, अपघाताची सखोल कारणे चौकशीनंतरच स्पष्ट होतील, असे प्रतिपादन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले. ईशान्य रेल्वेने तातडीने साहाय्यता पथके घटनास्थळी पाठविली आहेत.
पंतप्रधान मोदींकडून तातडीचे साहाय्य
ब्रिक्सच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताची माहिती कळविण्यात आली असून त्यांनी शोकसंदेश पाठविला आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीने अपघातात मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीमागे 2 लाख रुपयांची भरपाई त्यांनी घोषित केली. तसेच प्रत्येक जखमीसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्यही घोषित केले. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनही या अपघातासंबंधी दु:ख व्यक्त केले असून पिडीतांना साहाय्य करण्याची घोषणा केली आहे.









