हैतीच्या 25 नागरिकांना वाचविण्यास यश
वृत्तसंस्था/ नसाऊ
दक्षिण अमेरिकन देश बहामासच्या दक्षिणेकडील बेटांनजीक एक नौका समुद्रात बुडाली आहे. शरणार्थींना नेणारी हे नौकी समुद्रात उलटली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच बहामियन सुरक्षा दलांनी तेथे धाव घेत 25 जणांना वाचविले आहे. तर 17 जणांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत.
नौकेतून किती लोक प्रवास करत होते याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु बुडालेल्या नौकेत किमान 60 जण सामावू शकत होते. याचमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही नौका मियामीच्या दिशेने जात होती अशी माहिती पोलीस आयुक्त क्लेटन फर्नांडर यांनी दिली आहे.
समुद्राच्या मार्गे मानवी तस्करी होत असते. नौका बुडाल्यावर मानवी तस्करीशी संबंधित 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे बहामियन अधिकाऱयांनी सांगितले आहे.
हैती या देशातून बहामास मार्गे अमेरिकेत जाता येऊ शकते. मागील वर्षापासून अनेक हैती शरणार्थी अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचत आहेत. मे महिन्यात हैतीमधून 842 लोकांना अमेरिकेत नेणारी एक नौका समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली होती.









