ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
- काय म्हणाल्या आहेत वर्षा गायकवाड ?
येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा आम्ही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे अशा ठिकाणी पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या जातील. त्यासोबत शहरी भागात म्हणजेच महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल.
- फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा
शाळांची फी कमी करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू झाल्यावर काय ठरवायाचे यावर देखील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.








