चारपदरी रस्त्यांचे नियोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पहिल्या फ्लायओव्हरचे नियोजन करण्यात येत आहे. एकूण साडेचार किलोमीटर अंतराचा हा फ्लायओव्हर असून एकूण 167 पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या फ्लायओव्हरमुळे संकम हॉटेलपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत चारपदरी 18 मीटरचा रस्ता उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फ्लायओव्हरसाठी अंदाजे 4 हजार 500 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पालकमंत्री सतेश जारकीहोळी यांनी फ्लायओव्हरसाठी निधी मंजूर करून आणला. काही दिवसांपूर्वीच हुबळी येथील व्हीएलएस कन्सल्टंट कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
असा होणार फ्लायओव्हर
राष्ट्रीय महामार्ग ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत फ्लायओव्हर होणार आहे. यामध्ये ठिकठिकाणी जंक्शन देण्यात आले आहेत. फ्लायओव्हरवर चढण्यासाठी व उतरण्यासाठी स्वतंत्र रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशोक सर्कल येथे 40 मीटरचा रस्ता फ्लायओव्हरवर जाण्यासाठी देण्यात आला आहे. अशोक सर्कल ते महांतेशनगर येथे दुपदरी रस्ता होणार आहे. तर अशोक सर्कलपासून भाजी मार्केटपर्यंत दुपदरी रस्ता, तसेच 8.5 मीटर डेकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्लायओव्हर ते मध्यवर्ती बसस्थानक दुपदरी रस्ता असेल. संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथे तीन पदरी, संगोळळ रायण्णा सर्कल ते एसपी ऑफिस रोड दुपदरी, राणी चन्नम्मा सर्कल 31 मीटर रस्ता, चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुपदरी रस्ता, चन्नम्मा सर्कल ते बिम्स हॉस्पिटल चार पदरी व क्लब रोड येथे चार पदरी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.









