पुणे / प्रतिनिधी :
पुणे शहरात दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत असून, गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी मोहीम राबवून चोरटय़ांच्या ताब्यातून तब्बल 54 लाख 67 हजार रुपये किमतीच्या 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर आरोपी हे पुण्यातून दुचाकी चोरी करून त्याची बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
वाढत्या वाहन चोरीमुळे दुचाकी चोरटय़ांना पकडण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस पथकांना दिले होते. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील युनिट सहा, पाच, चार, दोन आणि दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथक दुचाकी चोरटय़ांच्या मागावर मागील एक महिन्यापासून होते. त्यानुसार ग्न्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, नितीन मुंडे यांना दुचाकी चोरटय़ांची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने सचिन प्रदीप कदम (रा. कळंब, धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपूर, ता. दौड, जि. पुणे), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय 28, रा. गोविंदपूर, ता. कळंब, जि. धाराशिव), युवराज सुदर्शन मुंडे (वय 23, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) या आरोपींना पकडले. पोलीस चौकशीत चोरटय़ांनी पुणे शहर परिसरातून चोरलेल्या दुचाकी आरोपी अजय शेंडे, शिवाजी गरुड यांना विक्रीसाठी दिल्याचे उघडकीस आले.
चोरटय़ांनी पुण्यातील दुचाकींची लातूर, धाराशिव, बीड परिसरात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुचाकींची कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून चोरटय़ांनी ग्रामीण भागात स्वस्तात दुचाकींची विक्री केली. अजय शेंडे चोरटय़ांच्या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. तर युनिट पाचच्या पथकाने व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने यासंदर्भात कारवाई करत आरोपींना अटक केली. एकूण 54 लाख रुपये किमतीच्या 162 दुचाकी जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.









