वुहानमध्ये 24 तासांत केवळ एक नवा रुग्ण : इटलीत दिवसात 349 जणांचा मृत्यू : युरोपीय देश हवालदिल : अमेरिकेत उपाययोजना
वॉशिंग्टन :
कोरोना विषाणूने मंगळवारपर्यंत 162 देशांमध्ये फैलाव केला असून आतापर्यंत एकूण 1 लाख 87 हजार 332 रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 7 हजार 177 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे याचदरम्यान 80 हजार 843 जण रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र ठरलेल्या वुहानमध्ये मागील 24 तासांमध्ये केवळ एक नवा रुग्ण आढळून आला आहे. तर इटलीत याच कालावधीत 349 जणांचा मृत्यू झाला आहे. गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेता ख्रिस्तोफर हिवजू आणि इदरिस एल्बा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. क्वाँटम ऑफ सोलेस या बाँडपटातील अभिनेत्री ओल्गा कुर्लिएन्कोलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
इस्रायलमध्ये फोन टॅपिंग

इस्रायलमध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत 250 रुग्ण आढळून आले असून यातील 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. काही लोक संसर्गाची माहिती लपवत असल्याचा सरकारला संशय आहे. या लोकांमुळे हा विषाणू अन्य लोकांमध्ये पसरत आहे. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील एक महिन्यापर्यंत संशयित रुग्णांचे फोन टॅप केले जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
वुहानमध्ये संकट ओसरतेय

चीनच्या वुहानमध्ये सोमवारी केवळ एक नवा रुग्ण सापडला आहे. परंतु इटलीत दोन दिवसांमध्ये 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी विक्रमी 368 जणांनी जीव गमावला होता. मंगळवारपर्यंत इटलीतील एकूण रुग्णांची संख्या 27980 वर पोहोचली आहे. आगामी काही दिवसांपर्यंत स्थितीत सुधारणा होणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे. इटलीतील एकूण बळींपैकी लोम्बार्डी या शहरात 66 टक्के मृत्यू झाले आहेत.
7.36 अब्ज डॉलर्सचे पॅकेज
न्युझीलंड सरकारने कोरोना संकटाच्या निवारणाकरता 7.36 अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंगळवारी जाहीर केले आहे. कोरोना संकटामुळे न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर प्रभाव पडला आहे. नागरिकांची सुरक्षा तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा व्हावी याकरता हे पॅकेज दिले जाणार असल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे. न्युझीलंडमध्ये मंगळवारपर्यंत एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत.
अमेरिकेचे नौदल चिंतेत

सॅन दियागो येथे अमेरिकेचा एक नौसैनिक कोरोनाने ग्रस्त आढळून आला आहे. हा नौसैनिक लोमा येथील नौदलाच्या तळावर तैनात होता. या तळावर सुमारे दोन हजार नौसैनिक देखील तैनात आहेत. या सर्व नौसैनिकांची तपासणी केली जाणार आहे. काही नौसैनिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
लॉस एंजिलिस सतर्क
स्वप्नांचे शहर म्हणवून घेणाऱया लॉस एंजिलिसमध्ये सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आणि नाइटक्लब बंद करण्यात आले आहेत. शासकीय तसेच बिगरशासकीय वाहनतळ पुढील आदेशापर्यंत शुल्क आकारू शकणार नाहीत. पर्यटक शहरात फिरूच शकत नसल्याने शुल्क आकारणी करता येणार नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.
टॉम हँक्स, रीटा यांना डिस्चार्ज

हॉलिवूड स्टार टॉम हँक्स आणि पत्नी रीटा विल्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तरीही या दोघांना 14 दिवस सेल्फ क्वारेंटाईन रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्ले यांच्यावर आधारित चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
सुरक्षा परिषदेची बैठक रद्द
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची मंगळवारी होणारी महत्त्वपूर्ण बैठक रद्द करण्यात आली आहे. तत्पूर्वी ही बैठक सोमवारी आयोजित होणार होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. चीन सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असून महामारीचा सर्वाधिक प्रभाव याच देशावर पडला आहे.
फ्रान्समध्ये टाळेबंदी

कोरोना विषाणूमुळे फ्रान्समध्ये संपूर्ण टाळेबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये मंगळवारपर्यंत 6633 रुग्ण आढळून आले असून 148 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी सरकारने एक लाख पोलीस कर्मचाऱयांना रस्त्यांवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये सैन्याचा वैद्यकीय विभाग कार्यरत झाला आहे.
लसखरेदीची इराणची तयारी
कोरोना विषाणूवर लस अद्याप उपलब्ध नसली तरीही इस्रायल याच्या समीप पोहोचल्याचे वृत्त आहे. इस्रायलने ही लस तयार केली असल्यास इराण ती खरेदी करणार असल्याचे उद्गार इराणच्या धर्मगुरुने काढले आहेत. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये कट्टर शत्रुत्व आहे. इराणने इस्रायलला अद्याप मान्यता दिलेली नाही.
एअरबसने उत्पादन रोखले

विमान निर्माता कंपनी एअरबसने स्पेन आणि फ्रान्समधील उत्पादन प्रकल्प पुढील 4 दिवसांपर्यंत रोखले आहे. एअरबसचे स्पेनमध्ये 12700 तर फ्रान्समध्ये 48000 कर्मचारी आहेत. याचबरोबर ब्रिटन, जर्मनी, रशिया, तुर्कस्तान, फिनलंड, पोलंड आणि रोमानियामध्ये कंपनीचे प्रकल्प आहेत.
बाँडगर्लला लागण
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्वांटम ऑफ सोलेस या बाँडपटात डॅनियल क्रेग यांच्या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री ओल्गा कुर्लिएन्कोला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गामुळे घरात कैद असून प्रकृती ढासळल्याचे ओल्गाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये जन्मलेली ओल्गा आता फ्रान्सची नागरिक आहे.









