ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पालघरमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 11 पैकी 5 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, इतर 6 आरोपींचा शोध सातपाटी सागरी पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील माहीम परिसरात पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी 16 वर्षीय मुलीवर 11 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अन्य सहा आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.