सातारा :
सोलापूरहून सज्जनगड येथे क्लासची सहल आली होती. या सहलीमध्ये असलेल्या एका 16 वर्षाच्या मुलीला चक्कर आल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. श्रावणी राहुल लिंमकर (रा. करमाळा, जि. सोलापूर) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोलापूरहून स्वस्तिक क्लासेसची सहल साताऱ्यातील सज्जनगड येथे आली होती. या क्लासची विद्यार्थिनी श्रावणी लिंमकर ही सज्जनगडावर सर्व विद्यार्थ्यांसोबत चालत पोहोचली. तोच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध झाली. यामुळे विद्यार्थी व शिक्षिका घाबरल्या. हे पाहून काही लोक मदतीसाठी धावले. तिला तत्काळ रूग्णवाहिकेतून खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेने सर्व विद्यार्थी व शिक्षिकेला धक्का बसला. तिच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेने सर्वत्र हळहळ होत आहे.
- श्रावणीच्या ह्य्दयाला छिद्र
श्रावणीला सहलीला जाण्यासाठी आई-वडील नको म्हणत होते. परंतु सर्व विद्यार्थी जात असल्याने तिनेही हट्ट केला. जन्मापासून तिच्या ह्य्दयाला छिद्र असल्याने तिला चढ चढणे, पळणे, अतिव्यायाम करण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. सज्जनगडवरील चढ चढून गेल्यावर तिने वडिलांना फोन करून मी सज्जनगडावर पोहोचले. मला कसलाही त्रास झाला नाही, असे सांगितले. वडिलांशी बोलून झाल्यावर तिला चक्कर आली आणि बेशुद्ध झाली.








